देशातील पहिली भुयारी मेट्रोचा मान मिळणाऱ्या मुंबई मेट्रो-3ची भूरळ परदेशी नागरिकांनाही पडत असल्याचं समोर आलंय. एका जपानी तरुणीनं भुयारी मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलाय.. या तरुणीनं मेट्रोच्या स्वच्छतेचे आणि सुरक्षिततेचं विशेष कौतुक केलंय. मेट्रोतील स्वच्छता पाहून तिला जपानमध्ये असल्यासारखे वाटल्याचं तिनं म्हटलं. वेळेचे पालन, प्रशस्त स्थानकं, लेडीज स्पेशल डब्बा अशा सर्वच सुविधांच या तरुणीनं भरभरून कौतुक केलं.
advertisement
जपानी तरुणीचा हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला. आम्हीही भुयारी मेट्रोच्या प्रवाशांना गाठत त्यांची मतं जाणून घेतली. यावेळी मेट्रो 3चा प्रवास करताना परदेशात प्रवास करण्याचा अनुभव येत असल्याची भावना व्यक्त केली. आरे ते कफ परेडदरम्यानच्या या मेट्रो मार्गिकेतील अद्ययावत सुविधांमुळं अत्यंत आरामदायी प्रवास होत असल्याचं प्रवासी सांगतात.
तरुणी काय म्हणाली?
व्हिडिओत ही तरुणी म्हणाली, माझ्यासोबत नवीन मुंबई मेट्रो लाईनवर पहिली सफर करा! अक्वा लाईन नुकतीच पूर्णपणे सुरू झाली आहे आणि ही मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो लाईन आहे. प्रवासादरम्यान ती मार्गाची सोय, आधुनिक रचना आणि स्वच्छतेचं कौतुक करत म्हणते, "मला जाणवलं की ही मेट्रो बांद्रा, बीकेसी आणि विमानतळ अशा सर्व महत्त्वाच्या ठिकाणांमधून जाते आणि खरं सांगायचं तर, मला असं वाटलं जणू मी परत जपानमध्ये आले आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि वेळेवर धावणारी मेट्रो!
भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या पसंतीस उतरली
मुंबईच्या रस्त्यांवर होणाऱ्या ट्रफिकमुळे अनेक जणांची अडचण होते. पण,भूयारी मार्ग असल्यानं मेट्रो 3 ट्रफिक टाळून जलद प्रवास करते. या मेट्रो मार्गामुळे मुंबई विमानतळ, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,चर्चगेटसारख्या महत्वाची ठिकाणी जोडली गेली आहे. अत्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासामुळं अगदी कमी कालावधीत भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या पसंतीस उतरली.