मुंबई महानगरपालिकेने नुकतेच दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला. स्वच्छता, आरोग्य आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाचा जैन समाजाकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. कबुतरांना दाणे खाऊ घालणे हे जैन समाजाच्या अहिंसेच्या तत्त्वाशी निगडित असल्याने, कबुतरखाना हे त्यांच्या धार्मिक श्रद्धेचं प्रतीक असल्याचं समाजातील प्रतिनिधींचं म्हणणं आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे कारण देत मुंबई महानगरपालिकेने अनेक कबुतरखाने बंद केले, तसेच कबुतरांना अन्न देऊ नये, असे आवाहन केले.
advertisement
१ नोव्हेंबरपासून उपोषणाला सुरुवात
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी म्हटलं आहे की, कबुतरखाना बंद करणे हा आमच्या धार्मिक भावनांचा अपमान आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे हिंसा किंवा संघर्षाचा मार्ग न निवडता, शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. दिवाळीनंतर, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून मी आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे. मुनींनी यावेळी प्रशासनाला विनंती केली आहे की, धार्मिक भावना लक्षात घेऊन हा निर्णय पुनर्विचारात घ्यावा. जैन समाजातील अनेक ट्रस्ट, संघटनाचा आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे.
आझाद मैदानातील आंदोलन शांततेत
दरम्यान, दादर परिसरातील कबुतरखाना बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी वाढत असून, मुंबईतील विविध जैन संघटना पुढील काही दिवसांत एकत्र येऊन शासनाकडे निवेदन देण्याची तयारी करत आहेत. आझाद मैदानातील हे उपोषण आंदोलन शांततेच्या मार्गाने जैन समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल, असं मुनींनी स्पष्ट केलं आहे. यामुळे, मुंबईत पुन्हा एकदा धार्मिक भावना आणि प्रशासकीय निर्णय असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.