मेट्रोचा प्रवास आणि ई-वाहनांची चार्जिंग एकाच ठिकाणी
मेट्रो 3 मार्गिकेवरील एकूण 23 ठिकाणी बॅटरी स्वॅपिंग मशीन्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुविधेमुळे ईलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी तसेच लहान व्यावसायिक वाहनांचे चालक काही मिनिटांत बॅटरी बदलू शकणार आहेत. त्यामुळे वाहन चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
'या' ठिकाणी बसणार बॅटरी स्वॅपिंग मशीन्स
advertisement
आरे जेव्हीएलआर, सिप्झ, एमआयडीसी, सांताक्रुझ मेट्रो स्थानक, वांद्रे-कुर्ला संकुल, धारावी, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या महत्त्वाच्या ठिकाणी ही बॅटरी स्वॅपिंग मशीन्स बसवण्यात येणार आहेत. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने ईलेक्ट्रिक वाहनचालकांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.
याआधी दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ मार्गिका आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवर अशा प्रकारची बॅटरी स्वॅपिंग केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्या ठिकाणी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही सुविधा मेट्रो 3 मार्गिकेवरही विस्तारण्यात येत आहे.
मुंबईतील वाढते वायू प्रदूषण लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी ईलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी मेट्रो स्थानकांजवळच बॅटरी बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळणार आहे
