एफ दक्षिण विभागातील अनेक जलवाहिन्या ब्रिटिश काळातल्या आहेत. जुन्या आणि झिजलेल्या पाइपलाइनमुळे पाणी गळते आणि त्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते. या प्रकल्पांतर्गत जुने पाईप बदलणे, गळतीची दुरुस्ती करणे आणि पाणीपुरवठ्याची योग्य व्यवस्था ठेवणे यावर भर दिला जाणार आहे. तसेच प्रकल्पाच्या पुढील दोन वर्षांच्या देखभाल कालावधीत कंत्राटदाराला 48 तासांच्या आत पाणीगळती किंवा दूषित पाणीपुरवठा दुरुस्त करण्याची जबाबदारी असेल.
advertisement
या प्रकल्पात परळ, माटुंगा, नायगाव, डिलायल रोड, अंबा परिसर आणि दक्षिण मुंबईच्या आसपासच्या भागांचा समावेश आहे. कामामध्ये पाणीगळती दुरुस्ती, नवीन सेवा जोडण्या देणे, जुने जोडण्या तोडणे, दूषित पाणी टाळण्यासाठी जुनी पाइपलाइन बदलणे आणि 300 मिमीपर्यंतच्या विविध व्यासाच्या जलवाहिन्या बसविणे यांचा समावेश आहे. तसेच नवीन वाल्व्ह, फायर हायड्रंट आणि बटरफ्लाय वॉल्व्ह बसवून पाणीपुरवठ्याची प्रणाली अधिक सुरक्षित केली जाणार आहे. खोदकामानंतर रस्ते, डांबर आणि फूटपाथ देखील पूर्ववत करण्यात येतील.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, काम सुरू असताना वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून कंत्राटदाराने वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे. कामासाठी साहित्य आणि उपकरणे ठेवण्यासाठी स्वतः जागा शोधून त्याची योग्य परवानगी घ्यावी लागेल.
या प्रकल्पामुळे या भागातील पाणीगळती आणि दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल. नागरिकांना आता सुरक्षित आणि स्वच्छ पाणी मिळेल तसेच जुना आणि झिजलेला पाणीपुरवठा सुधारून भविष्यातील तक्रारींवरही नियंत्रण मिळवता येईल.