आजचं हवामान: ऑक्टोबर हिटच्या झळा; मुसळधार पावसाचंही संकट, पुढचे 4 दिवस कसं राहणार हवामान?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शक्ती चक्रीवादळ ओमानकडे सरकत असून महाराष्ट्रात पाऊस, उकाडा आणि दमट हवामानाचा इशारा. कोकणात यलो अलर्ट, विदर्भात उन्हाचा तडाखा, ला निनाचा परिणाम दिसणार.
मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेलं शक्ती चक्रीवादळ आता ओमानच्या दिशेने सरकत असलं, तरी त्याच्या परिणामांची लाट अजूनही महाराष्ट्रावर आहे. चक्रीवादळामुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा धोका तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा – अशी विरोधाभासी परिस्थिती पुढील काही दिवस दिसणार आहे. मान्सूनच्या परतीच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलेला अंदाज सावध करणारा आहे, कारण पुढचे चार दिवस पाऊस, उकाडा आणि दमट हवामान अनुभवयाला मिळू शकतं.
शक्ती चक्रीवादळाची काय स्थिती?
शक्ती चक्रीवादळ ओमानच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. अरबी समुद्रात पुढे सरकलं असून 7 ऑक्टोबर रोजी त्याची तीव्रता आणि परिणाम आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर या शक्ती चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर पाकिस्तानकडून देखील सायक्लोनिक सर्क्युलेशन येत आहे. त्यामुळे एक टर्फ लाइन गुजरातपर्यंत तयार झालं आहे.
advertisement
विदर्भात उन्हाचा तडाखा
हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर सुप्रीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. 7 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विदर्भ वगळता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणपट्ट्यात मेघगर्जनेसह राहणार पाऊस
कोकण विभागातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. समुद्रकिनारी भागांतील नागरिकांना हवामानातील बदल लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
पुढचे चार दिवस कसं असेल हवामान?
8 ऑक्टोबर रोजी विदर्भ वगळता महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. कोकणपट्ट्यात मेघगर्जनेसह पाऊस राहण्याची शक्यता आहे. 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील, यावेळी दमट हवामान राहणार असून त्यामुळे उकाडा वाढण्याची शक्यता आहे. 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी पाऊस पूर्णपणे जाणार आहे. त्यासोबत उकाडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
दुसरीकडे ला निनाचा परिणाम यावर्षी दिसून येणार आहे. प्रशांत महासागरात ला निनामुळे यंदा थंडी जास्त वाढण्याची शक्यता आहे. अति पाऊस, अति थंडी आणि अति उष्णता राहू शकते. याशिवाय ऑक्टोबर हिटच्या झळा देखील मे महिन्यासारख्या जाणवू शकतात असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 7:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: ऑक्टोबर हिटच्या झळा; मुसळधार पावसाचंही संकट, पुढचे 4 दिवस कसं राहणार हवामान?