फसवणूक झालेला कापड व्यावसायिक विलेपार्ले परिसरात राहत असून त्याची घाटकोपरमध्ये खासगी कंपनी आहे. गेल्या वर्षी त्याची ओळख ध्रुव मेहता नावाच्या व्यक्तीशी झाली होती. व्यवसायानिमित्त झालेल्या या ओळखीत ध्रुवने तो गारमेंट आणि फॅब्रिक ॲक्सेसरीजच्या बिझनेससोबतच सर्व आर्थिक व्यवहार क्रिप्टो करन्सीद्वारे करत असल्याचे सांगितले. क्रिप्टोमध्ये व्यवहार केल्यास रूपयांच्या तुलनेत जास्त फायदा मिळतो, असे सांगत त्याने व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला.
advertisement
ध्रुवने त्याच्या ओळखीचे काही डिलर्स क्रिप्टो करन्सी पुरवतील, असे सांगून व्यावसायिकाला व्यवहारासाठी तयार केले. त्यानुसार तक्रारदार आपल्या भावासोबत अंधेरीतील ध्रुवच्या कार्यालयात गेला. त्या ठिकाणी ध्रुवसोबत इतर सातजण उपस्थित होते. यावेळी ध्रुवने ॲन्थोनी साहिल, अमजद शेख, अजगर हुसैन, शेख अशफाक, मनोज प्रजापती आणि मोहम्मद तौसिन खान अशी सर्वांची ओळख करून दिली. व्यवहाराच्या वेळी, 90 लाख रुपये ॲन्थोनी साहिलला द्यायला सांगितले.
पैसे मिळाल्यानंतर क्यूआर कोडद्वारे एक लाख युएसडीटी क्रिप्टो करन्सी ट्रान्स्फर केली जाईल, असे आरोपींनी सांगितले. मात्र रक्कम दिल्यानंतर बराच वेळ उलटूनही क्रिप्टो करन्सी तक्रारदाराच्या खात्यात जमा झाली नाही. संशय बळावल्याने तक्रारदाराने ध्रुव आणि इतर आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळातच सर्व आरोपींचे मोबाईल बंद झाल्याचे लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार उघड झाला. यानंतर तक्रारदाराने एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली.
या गुन्ह्यात गेल्या महिना भरापासून फरार असलेल्या ॲन्थोनी साहिल, सोहेल खान आणि अमजद अली शेख यांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
