कायदेशीर कारवाईचे कारण काय?
मुंबईत दरवर्षी थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला, बांधकाम स्थळांवर लोक शेकोटी पेटवतात. मात्र, या शेकोट्यांमधून धूर आणि कणयुक्त प्रदूषक पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता घसरते आणि श्वसनासंबंधी आजार वाढतात. हे लक्षात घेऊन महापालिकेने यंदा विशेष पथके स्थापन केली आहेत.
कोणती होणार कारवाई?
पालिकेकडून सांगण्यात आलं आहे की, शेकोटी पेटवल्यामुळे हवा प्रदूषित होते आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे शेकोटी पेटवणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रत्येक व्यक्तीला नियमभंग केल्यास एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
advertisement
महापालिकेने अनेक वेळा नागरिकांना शेकोटी न पेटवण्याचं आणि पर्यावरण वाचवण्याचं आवाहन केलं आहे. तरीदेखील अनेक ठिकाणी लोक हे नियम पाळत नाहीत. त्यामुळे आता थेट दंड आकारण्याची पद्धत लागू करण्यात आली आहे.
विशेष पथकांची राहणार नागरिकांवर नजर
प्रत्येक विभाग कार्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक आणि मुकादम यांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक नियमितपणे परिसराची पाहणी करेल आणि ज्या ठिकाणी शेकोटी पेटवली जाते तिथे तत्काळ कारवाई करेल. तसेच जागेवरच एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल.
याशिवाय हे पथक नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीही करणार आहे. शेकोटीऐवजी उब मिळवण्यासाठी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
महापालिकेचा उद्देश केवळ दंड आकारणे नसून, हवेचं प्रदूषण कमी करणे आणि मुंबईकरांच्या आरोग्याचं रक्षण करणे हा आहे. त्यामुळे नागरिकांनी शेकोटी न पेटवता, स्वच्छ आणि निरोगी वातावरण राखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
