राज्य महामार्गाचे सुमारे 1 हजार 600 मीटर लांबीचा हा रस्ता सध्या सात मीटर रुंद असून तो आता 14 मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. या मार्गावर दुभाजक बसविण्याचाही प्रस्ताव असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. परिणामी येत्या काळात हा मार्ग मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी खुला होणार असून वाहनचालकांना होणाऱ्या कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
advertisement
उरण ते नेरुळ-बेलापूर लोकल प्रकल्प तसेच द्रोणागिरी परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकवस्तीमुळे उरण-पनवेल मार्गावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या काही काळात अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अनेक वर्षांपासून या दुहेरी मार्गाच्या रुंदीकरणाची मागणी होत होती. पावसाळ्यात रस्ता अधिकच अरुंद व धोकादायक होत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
द्रोणागिरी नोड परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी वाढली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन बोकडवीरा-नवशेवा उड्डाणपूल तसेच भेंडखळ-खोपटे मार्गाच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. मात्र, सुरू असलेल्या कामामुळे धुळीचा त्रास वाढला असून, स्थानिक नागरिक, मजूर आणि वाहनचालकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
