दगडफेकीच्या घटनांनंतर नांदेड आगाराच्या सर्व बस फेऱ्या रद्द
बसवरील दगडफेकीच्या घटनांनंतर नांदेड जिल्ह्यातील एसटी बसच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल नांदेड आगाराची नागपूरकडे जाणारी बस जाळण्यात आली होती. आज किनवट आणि देगलूर आगाराच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. शिवाय अनेक एसटी बसेसवरील मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर काळे फासण्यात आले. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढील परिस्थिती बघुन बस फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. प्रवश्यानी बसेस सुरू आहेत की नाही याची माहिती घेऊनच प्रवासाचा बेत करावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
advertisement
मराठा आरक्षणासाठी रविवारपासून रणरागीणी मैदानात जामखेड बससेवा बंद
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाची पूर्तता करण्यासाठी 24 ऑक्टोबरची मुदत दिली होती. मात्र, यावर तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून रविवारी पाचवा दिवस आहे. त्यांनी पाच दिवसापासून अन्न आणि पाण्याचा त्याग केला आहे. त्या दिवसापासून जामखेडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या महिला बाहेर पडल्या आणि त्यांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले व एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन तहसील परिसर दणाणून सोडला आहे. तसेच जामखेड बस आगाराने एसटी बसेस सेवा बंद केल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे.
वाचा - संभाजीराजेंचा जरांगे पाटलांना फोन, जरांगे पाटील राजेंच्या विनंतीचा मान राखणार?
धारशिवची बस सेवा बंद करण्याचा निर्णय
धाराशिवमधील मराठा समाजाचा आंदोलनाला हिंसक वळण लागले. तासाभराच्या फरकात दोन बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. सारोळा आणि ढोकी गावात बसवर दगडफेक झाली. सारोळा धाराशिव लातूर धाराशिव या बसवर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तर बसवरील राज्य शासनाच्या जाहिरातीही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काढल्या तर काही ठिकाणी जाहिरातीच्या फोटोला कासले. दगडफेक केलेल्या बसवर मराठा समाजाला आरक्षण द्या लिहून मागणी करणारे कार्यकर्ते पसार झाले. या घटनानंतर धारशिवची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षण आंदोलनाचा परिवहन विभागाला फटका बसतांना पाहायला मिळत आहे. नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे आयजी महावरकर आणि हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या सुचनेनुसार एसटी विभागाने बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी आणि हिंगोली दोन जिल्ह्यातील एकूण 7 आगारातील 380 बसेचच्या 2800 फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास 350 बसेस जागेवर उभ्या आहेत. तसेच, आज सायंकाळी पाच वाजेनंतर उद्या बस सुरु करायच्या की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
