मेट्रो 2 बी मार्गिकेच्या मंडाळे ते चेंबूर या पहिल्या टप्प्यासाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांचे अंतिम प्रमाणपत्र सुमारे तीन महिन्यांपूर्वीच मिळाले होते. मात्र, उद्घाटनासाठी मान्यवरांची वेळ न मिळाल्याने आणि त्यानंतर पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या मार्गिकेचे लोकार्पण रखडले. डिसेंबरअखेरीस उद्घाटन होईल अशी अपेक्षा होती, परंतु निवडणुकीमुळे ते पुढे ढकलले गेले. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने फेब्रुवारीत ही मेट्रो सेवा सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
advertisement
AC local : आनंदाची बातमी! आजपासून पश्चिम रेल्वेवर धावणार अधिक एसी लोकल; वाचा संपूर्ण वेळापत्रक
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) द्वारे उभारली जात असलेली मेट्रो 9 मार्गिकाही प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. एकूण 12.6 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव हा 4.4 किलोमीटरचा पहिला टप्पा लवकरच सुरू केला जाणार आहे. या मार्गिकेसाठी मागील आठवड्यात सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले आहे. याशिवाय मेट्रो 4 (32.32 किमी) आणि मेट्रो 4 अ (2.7 किमी) या मार्गिकांवर एकूण 32 स्थानके प्रस्तावित आहेत. पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
मेट्रो 2 बी मार्गिकेची एकूण लांबी 23.6 किलोमीटर असून 19 स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात मंडाळे ते डायमंड गार्डन या 5.3 किलोमीटरच्या मार्गावर मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन ही स्थानके असतील. तर मेट्रो 9 मार्गिकेवर दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव आणि काशीगाव ही स्थानके पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहेत. या प्रकल्पावर सुमारे 6607 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो मार्गिकांमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक सुलभ होणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.






