Mumbai News : ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच लुटलं! पवईतील बाप-लेकाच्या 35 वर्षांच्या ओळखीचा घात झाला
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
MBBS Admission Scam : एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत पवई परिसरात एका बाप-लेकाने तब्बल ४.७१ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : एमबीबीएसचे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 4 कोटी 71 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात मुन्सिराम सिरोज नाविक (वय 66) आणि त्याचा मुलगा संदीप नाविक (वय 40) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
35 वर्षांच्या ओळखीचा विश्वासघात
या प्रकरणातील फिर्यादी भूषणकुमार कक्कर (वय 69) हे पवई परिसरात वास्तव्यास असून गॅस किट बसविणे आणि विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे आरोपी मुन्सिराम नाविक याच्याशी गेल्या सुमारे 35 वर्षांपासून व्यावसायिक तसेच कौटुंबिक संबंध होते. याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपींनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे.
तक्रार दाराचे कौटुंबिक डॉक्टर बाळकृष्ण ठाकरे यांच्याशीही आरोपींचे घनिष्ठ संबंध होते. एप्रिल 2022 मध्ये डॉ. ठाकरे यांचा मुलगा अर्थ हा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे तेथील परिस्थिती बिघडल्याने अर्थला शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. त्यामुळे त्याला महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश मिळावा यासाठी डॉ. ठाकरे प्रयत्न करत होते.
advertisement
याच काळात मुन्सिराम नाविक याने आपल्या ओळखीतील प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून एमबीबीएस प्रवेश करून देण्याचे प्रलोभन दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जून 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत डॉ. ठाकरे यांच्याकडून 3 कोटी 50 लाख रुपये, फिर्यादी भूषणकुमार कक्कर यांच्याकडून 1 कोटी रुपये तसेच त्यांच्या मुलगी जया आणि जावई विजय गुजरन यांच्याकडून 21 लाख रुपये अशी एकूण 4 कोटी 71 लाख रुपयांची रक्कम आरोपींना देण्यात आली.
advertisement
मात्र बराच कालावधी उलटूनही प्रवेश न मिळाल्याने संशय बळावला. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फिर्यादीने पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 9:21 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच लुटलं! पवईतील बाप-लेकाच्या 35 वर्षांच्या ओळखीचा घात झाला









