या डबलडेकर पुलामुळे दोन इमारतींमधील एकूण 83 घरे बाधित होणार आहेत. लक्ष्मी निवास इमारतीतील 60 तर हाजी नुरानी इमारतीतील 23 रहिवाशांचा यात समावेश आहे. बाधित रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर असून त्यांना म्हाडाच्या मालकीची घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या पुनर्वसनावरून आता एमएमआरडीए आणि म्हाडामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
advertisement
म्हाडाने स्पष्ट भूमिका घेतली असून आधी घरांची किंमत आणि दुरुस्तीसाठी झालेला खर्च दिल्यानंतरच घरे ताब्यात देण्यात येतील असे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रेडी रेकनरनुसार 110 टक्के दराने घरांची किंमत निश्चित करण्यात आली असून ही एकूण रक्कम सुमारे 97 कोटी रुपये आहे. याशिवाय घरांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, दादर, प्रभादेवी, माहीम, माटुंगा, वडाळा आणि अँटॉप हिल परिसरातील एकूण 119 घरे एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली होती. त्यापैकी 83 घरांची निवड करण्यात आली आहे. बाधित रहिवाशांची मागणी आहे की त्यांना याच परिसरात घरे मिळावीत. त्यामुळे पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी दोन्ही यंत्रणांमध्ये लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे.
