प्रतिक्षानगर आगारातील बस क्रमांक MH01DR4654, रूट 169, या बसचा शनिवारी (5 ऑक्टोबर) उशिरा रात्री साडेअकराच्या सुमारास प्लाझा बस थांब्यावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शाहाबुद्दीन (वय 37) या पादचारीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
ही बस वरळी डेपोवरून प्रतिक्षानगर आगाराकडे जात होती. रात्री सुमारे 11.15 वाजता बस प्लाझा बस थांब्याजवळ थांबण्यासाठी येत असताना, दादर टी.टी.कडून शिवाजी पार्कच्या दिशेने येणाऱ्या 20 सीटर टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने नियंत्रण गमावले. त्याने थेट बसच्या उजव्या पुढील टायरवर जोरदार धडक दिली. या धडकेचा जोर एवढा होता की बस घसरून डावीकडे झुकली आणि थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांवर व पादचाऱ्यांना धडकली.
advertisement
या अपघातात शाहाबुद्दीन (37) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर राहुल अशोक पडाले (30), रोहित अशोक पडाले (33), अक्षय अशोक पडाले (25) आणि विद्या राहुल मोते (28) हे चौघे जखमी झाले. सर्व जखमींना बस कंडक्टर आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शाहाबुद्दीन यांना दाखल होण्यापूर्वीच मृत घोषित केले.
धडकेनंतर टेम्पो ट्रॅव्हलरने एक टॅक्सी आणि एक टुरिस्ट कारलाही धडक दिली. ज्यामुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. बसचा पुढील उजवा टायर फुटला असून विंडशील्ड काच तुटली असल्याची माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.