महावितरणकडून सप्टेंबर महिन्यातील वीज वापरावर आधारित इंधन समायोजन शुल्क (Fuel Adjustment Charges – FAC) लादण्यात आले असून, ऑक्टोबर महिन्याच्या बिलात हे शुल्क समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक सर्वच ग्राहकांच्या विजेच्या बिलात वाढ होणार आहे.
advertisement
वीज दरवाढीचं कारण
महावितरणने जुलैपासून वीजदर कमी केल्याचा दावा केला असला, तरी आता दिवाळीच्या आधीच दरवाढ करून महागाईच्या आगीत तेल ओतलं आहे. सप्टेंबर महिन्यात विजेची मागणी वाढल्याने खुल्या बाजारातून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच जास्त उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागल्याने एकूण खर्च वाढला. या वाढीव खर्चाची भरपाई महावितरण इंधन समायोजन शुल्काच्या स्वरूपात ग्राहकांकडून वसूल करत आहे.
किती वाढणार आहे वीजबिल?
सप्टेंबर महिन्याच्या वापरावर आधारित वाढ ऑक्टोबरच्या बिलात दिसणार आहे. सरासरी प्रति युनिट 35 पैसे ते 95 पैशांपर्यंत वाढ आकारण्यात आली आहे. घरगुती ग्राहकांमध्ये बीपीएल (गरीबी रेषेखालील) ग्राहकांना प्रतियुनिट 15 पैसे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. 1 ते 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट 35 पैसे, 101 ते 300 युनिट वापरणाऱ्यांना 65 पैसे, तर 301 ते 500 युनिट वापरणाऱ्यांना 85 पैसे वाढीव द्यावे लागणार आहेत. 501 युनिटपेक्षा अधिक वापर झाल्यास प्रतियुनिट तब्बल 95 पैसे अतिरिक्त आकारले जाणार आहेत. म्हणजेच, 100 युनिटच्या बिलासाठी साधारणपणे 35 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.
एक महिन्यापुरतं की कायमचं?
महावितरणकडून दिलेल्या माहितीनुसार, ही आकारणी फक्त सप्टेंबर महिन्यातील वापरासाठी आहे. मात्र विजेची मागणी वाढत राहिली, तर पुढील काही महिन्यांतही असं शुल्क पुन्हा लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ईव्ही चार्जिंग स्टेशनवरही परिणाम
इंधन समायोजन शुल्क केवळ घरगुती व व्यावसायिक ग्राहकांपुरते मर्यादित नसून, ईव्ही चार्जिंग स्टेशनवरही प्रतियुनिट 45 पैसे शुल्क आकारले जात आहे.