शहरातील सीएनजी तुटवड्याचा फटका आता बेस्ट च्या बस सेवेलाही बसू लागला आहे. दुपारनंतर रस्त्यावर धावणाऱ्या शेकडो बसगाड्या इंधनाअभावी डेपोमधून निघणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या गैरसोय होण्याची शक्यता आहे. विशेषतः उपनगरातील अनेक डेपोमध्ये सीएनजीचा पुरवठा अपुरा ठरत असून बेस्ट व्यवस्थापन चिंतेत आहे.
घरी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका
मुंबई आणि उपनगरातील मोठा प्रवासी वर्ग रोजच्या रोज कार्यालय, शाळा, व्यवसायासाठी बेस्ट सेवेवर अवलंबून असतो. मात्र सच्या पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडामुळे सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे बेस्टच्या डेपोमध्ये इंधनाची कमतरता जाणवत आहे. काही डेपोमध्ये सकाळच्या वेळेत उपलब्ध असलेला मर्यादित स्टॉक वेगाने संपत असल्याने दुपारपासून संध्याकाळपर्यंत बससेवा कमी करण्याशिवाय पर्याय राहत नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
advertisement
उपनगरातील बससेवा प्रभावीत होणार
सीएनजी तुटवड्यामुळे उपनगरातील धारावी, वांद्रे, दहिसर, गोरेगाव, मुलुंड आणि भांडुप या भागातील बससेवा सर्वाधिक प्रभावित होणार असल्याचे संकेत आहेत. विशेषतः कार्यालयीन वेळेला घरी जाण्यासाठी बेस्ट हा अनेकांचा एकमेव आणि परवडणारा पर्याय असल्याने संध्याकाळी हजारो मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यता आहे.
सीएनजीवर चालणाऱ्या खासगी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता
वडाळा येथील आरसीएफ परिसरात असणाऱ्या पाईपलाईनमध्ये हा तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे सीएनजी पुरवठा ठप्प आहे. हा बिघाड दुरुस्त होण्यास आणखी किती तास जातील, याबद्दल अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या रस्त्यावर धावत असलेल्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅबचालकांच्या वाहनांमधील सीएनजी देखील संपत आला आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत न झाल्यास मुंबईतील रिक्षा-टॅक्सीसह सीएनजीवर चालणाऱ्या खासगी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
मार्केटमधील सर्वात स्वस्त CNG कार कोणती? खरेदीपूर्वी जाणून घ्या डिटेल्स
