मुंबईचा कोस्टल रोड झाला धोकादायक
कोस्टल रोड प्रवासाठी २४ तासांसाठी खुला झाल्यानंतर गाड्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली होती मात्र आता अनियंत्रित वेगमर्यादा आणि बंद दिव्यांमुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वरळी ते वांद्रे सी लिंकदरम्यान रस्त्यावरील खांबांवरील दिवे बंद असल्याने रात्री प्रवास करणाऱ्यांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे.
एका प्रवाशाने सोशल मीडियावरून याबाबत तक्रार केली असून, मुंबईकरांनी सवाल केला आहे – “14 हजार कोटी खर्च करूनही सुरक्षिततेचा बोजवारा असेल, तर आम्ही अजून विजेचे पैसे द्यायचे का?” सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार 8 हजारांहून अधिक वाहनांनी वेगमर्यादा ओलांडली, तर काही गाड्यांचा वेग बोगद्यात ताशी 147 किमीपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे.
advertisement
अपघातांचा धोका वाढला
यातच अंधारामुळे वळणांवर दृश्यमानता कमी होत असल्याने गंभीर अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. पादचाऱ्यांसाठी तयार केलेल्या भुयारी मार्गात देखील दिवे बंद असून नागरिकांना मोबाइल लाइट वापरून चालावे लागते, ही परिस्थिती आणखी चिंताजनक आहे.
ऑक्टोबरमध्ये एका कारने वेगमर्यादा तोडून कठडा फोडत थेट समुद्रात कोसळल्याची थरारक घटना घडली होती. या अपघातात लोखंडी रेलिंगचे मोठे नुकसान झाले आणि पालिकेने संबंधित चालकाला तब्बल २.६५ लाखांची नुकसानभरपाईची नोटीस पाठवली आहे.
मुंबईचा ड्रीम रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडवर दिवे बंद, अंधार, आणि वेगाचा कहर पाहता, हा मार्ग सौंदर्यापेक्षा अधिक धोकादायक ठरत चालल्याची भीती मुंबईकरांमध्ये पसरली आहे.
