असा असणार मेट्रो 2 ब चा प्रवास
मेट्रो 2 ब ही मार्गिका अंधेरी पश्चिम ते मंडाळे अशी एकूण 23.64 किमी लांबीची आहे. यात 20 स्थानके असून सध्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखुर्द आणि मंडाळे डेपो ही प्रमुख स्थानके आहेत. महत्त्वाचे म्हणजे या मार्गिकेला CMRS चे प्रमाणपत्र मिळाले असून उद्घाटनानंतर लगेच प्रवाशांसाठी सेवा सुरू होणार आहे.
advertisement
प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होणार
या मार्गिकेचा दुसरा टप्पा पुढील वर्षी कार्यान्वित होईल. त्यानंतर मंडाळे ते दहिसर पूर्व असा सलग मेट्रो प्रवास शक्य होईल. पूर्ण मार्गिका सुरू झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना थेट जोडणी मिळेल. याशिवाय पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मेट्रो 1, 2 अ, 3 आणि 4 या सर्व नेटवर्कला ही नवीन मेट्रो जोडेल. यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होणार असल्याचा अंदाज आहे.
मंडाळे कारशेड मेट्रोचं नवं केंद्र
या प्रकल्पासाठी मंडाळे येथे 31 एकर जागेवर अत्याधुनिक कारशेड उभारण्यात आले आहे. येथे एकावेळी 72 मेट्रो गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था आहे. ही सुविधा भविष्यातील मेट्रो सेवांसाठीही महत्त्वाची ठरणार आहे.
या मेट्रोचा शुभारंभ आधी मेट्रो 3 सोबत पंतप्रधानांच्या हस्ते व्हायचा होता. मात्र प्रमाणपत्र उशिरा मिळाल्याने तो कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. नंतर 31 ऑक्टोबरला उद्घाटनाचे नियोजन झाले, पण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेळ मिळू शकला नाही. अखेर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने पुढाकार घेत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.






