संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून 5.30 किमी बोगदा
हा जोडरस्ता गोरेगाव येथील चित्रनगरी परिसरापासून सुरू होऊन मुलुंडपर्यंत जाणार आहे. या मार्गामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. त्यामुळे सध्या मोठा वळसा घालून करावा लागणारा प्रवास कमी होऊन प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होणार आहे.
Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई प्रवास सुसाट, मिसिंग लिंकबाबत मोठं अपडेट, कधी खुली होणार?
advertisement
या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातून सुमारे 5.30 किलोमीटर लांबीचा जोड बोगदा तयार केला जात आहे. हा बोगदा अत्याधुनिक टनल बोरिंग मशीन या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खोदण्यात येत आहे. संरक्षित जंगलातून बोगदा तयार करताना पर्यावरण आणि वन्यजीवांवर कमीत कमी परिणाम होईल याची विशेष काळजी घेतली जात आहे.
चित्रनगरी परिसरात 1.32 किमी पेटी बोगदा
या प्रकल्पामध्ये चित्रनगरी परिसरात सुमारे 1.32 किलोमीटर लांबीचा पेटी बोगदा उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर या बोगद्याला जोडणारे रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्याचे कामही प्रकल्पात समाविष्ट आहे.
नोव्हेंबर 2023 पासून कामाला सुरुवात
या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून नोव्हेंबर 2023 पासून प्रत्यक्ष बांधकामाचे काम सुरू झाले आहे. सध्या बोगदा आणि जोडरस्त्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा संरक्षित वनक्षेत्र असल्यामुळे प्रकल्प राबविताना वन्यजीव संरक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या एक टक्का निधी वन्यजीव संवर्धनासाठी राखून ठेवण्यात आला आहे. त्याअंतर्गत 20 कोटी रुपये वन विभागाकडे जमा करण्यात येणार आहेत.
मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी योजना
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने या प्रकल्पाला पूर्वी काही अटींसह मंजुरी दिली होती. त्या अटींनुसार संरक्षित क्षेत्रात मानवी आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तसेच वन्यजीव संवर्धनासाठी स्वतंत्र योजना तयार करणे आवश्यक आहे. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच तुंगारेश्वर अभयारण्य परिसरात मानवी-वन्यजीव संघर्ष निवारण आणि वन्यजीव संवर्धन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनांची अंमलबजावणी राज्याचे मुख्य वनसंरक्षक आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या संपूर्ण प्रकल्पाचे काम नियोजनानुसार ऑक्टोबर 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव ते मुलुंड दरम्यानचा प्रवास लक्षणीयरीत्या कमी होणार असून मुंबईतील वाहतुकीच्या व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.






