या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने हा खटला जलदगती न्यायालयाकडे वर्ग करून तो लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. मॉब लिंचिंग संबंधित खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालये स्थापन करण्याच्या २०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत अफान यांची पत्नी अफरोज अन्सारी (वय २४) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी भरपाई म्हणून एक कोटी रुपये देण्याची आणि खटला सहा महिन्यांत पूर्ण करण्याची मागणी केली होती.
advertisement
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने पाच लाख रुपयांची अंतरिम भरपाई देण्याची हमी हाय कोर्टाला दिली. यानंतर न्यायालयाने हे प्रकरण जलदगती कोर्टाकडे पाठवलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
२४ जून २०२३ रोजी अफान अन्सारी (३२) आणि त्यांचा चालक नासिर कुरेशी (२४) हे अहिल्यानगर येथून मांस खरेदी करून समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेनं जात होते. यावेळी १४-१५ जणांच्या जमावाने त्यांची गाडी अडवली. यावेळी टोळक्याला त्यांच्या गाडीत मोठ्या प्रमाणात मांस आढळून आलं. ते मांस नक्की कशाचं आहे, याची शाहनिशा न करता कथित गोरक्षकांनी अफान आणि नासीर यांना काठ्या आणि लोखंडी सळईने मारहाण केली होती. या हल्ल्यात अफान यांचा मृत्यू झाला होता. अफान यांच्या पश्चात पत्नी अफरोज आणि दोन लहान मुली आहेत. न्यायालयाने आता हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.