मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जर भाजप सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेत असेल, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) त्यांना पाठिंबा देऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. हा निर्णय झाल्यास राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा जुन्या युतीच्या चर्चेला उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
मुंबईत भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर ठाकरे गटाने 65 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीकडे (भाजप आणि शिंदे गट) एकत्रितपणे 118 जागांचे संख्याबळ आहे, जे बहुमताच्या 114 या आकड्यापेक्षा जास्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे 29 नगरसेवक आहेत. त्यामुळे शिंदेंना आता मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिंदे यांच्यात महापौर पदावरून रस्सीखेंच सुरू आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत जरी भाजप आणि शिंदेंना बहुमत मिळालं असलं तरी मुंबईची सत्तेची चावी थेट दिल्लीतून चालावी अशी दिल्लीश्वरची इच्छा आहे, अशी माहिती समोर आली होती. त्यासाठी आपला माणूस म्हणून एकनाथ शिंदेंना पसंतीक्रम होता. मात्र, दावोसला जाण्यासाठी गेम ठाकरेंच्या पारड्यात पाडला अन् मुंबईचं सत्ताकेंद्र आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला गेलाय का? असा सवाल विचारला जातोय.
मुंबई महापालिकेत रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे महापौर निवडीच्या प्रत्यक्ष मतदानावेळी ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक अनुपस्थित राहू शकतात. जर ठाकरे गटाचे नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिले, तर बहुमताचा आकडा खाली येईल आणि भाजपचा महापौर निवडून येण्याचा मार्ग मोकळा होईल. अशा प्रकारच्या 'न्यूट्रल' भूमिकेमुळे भाजपला कोणत्याही थेट युतीशिवाय मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करणं सोपं जाणार असल्याचं बोललं जात आहे.
