कामाच्या वेळेत खोळंबा
सकाळची वेळ म्हणजे प्रत्येकासाठी वेळेवर धावण्याची शर्यत असते. नेमक्या याच वेळी तांत्रिक कारणामुळे मेट्रो ३ (Metro 3) ठप्प झाली. तांत्रिक अडचण नेमकी काय आहे, याची स्पष्ट माहिती लगेच मिळाली नाही, पण मेट्रो थांबल्यामुळे अनेक प्रवाशांचा महत्त्वाचा वेळ वाया गेला. प्रत्येकजण 'आता पुढे काय?' या विचारात होता. अनेकांनी आपली ऑफिसमधील मीटिंग, ट्रेनचे वेळापत्रक किंवा महत्त्वाचे वर्ग चुकल्याची चिंता व्यक्त केली.
advertisement
मेट्रोनं व्यक्त केली दिलगिरी
मेट्रोच्या आतमध्ये असलेल्या डिजिटल बोर्डवर प्रवाशांना 'कृपया लक्ष असू द्या, तांत्रिक कारणामुळे मेट्रोला विलंब होत आहे. त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत,' असा संदेश सतत दाखवला जात होता. हा संदेश प्रवाशांसाठी दिलासा देण्याऐवजी, त्यांची हतबलता वाढवणारा होता. कारण, नेमका किती वेळ लागेल किंवा पर्यायी व्यवस्था काय आहे, याची कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. अनेक प्रवाशांनी खाली उतरून पर्याय शोधायला सुरुवात केली, तर काहीजण ताटकळत उभे राहिले.
गर्दीमुळे प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप
मेट्रो ठप्प झाल्यामुळे कफ परेड आणि आसपासच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली. एका बाजूला उकाडा आणि दुसऱ्या बाजूला वेळेवर न पोहोचण्याची चिंता... यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे आणि संतापाचे वातावरण होते. 'मेट्रोचा प्रवास जलद होईल म्हणून निवडला, पण आज रस्त्यावरील वाहतुकीपेक्षा जास्त वेळ इथेच गेला,' अशा भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केल्या.
