अंधेरी (प.) ते दहिसर मेट्रो-२A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो-७ या मार्गिकांवर लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने या दोन्ही मार्गिकांसाठी भाडे निर्धारण समिती गठित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून, केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या समितीच्या गठनाचा प्रस्ताव ऑगस्टमध्ये राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्याने गेल्या महिन्यात त्यास मंजुरी दिली आणि त्यानंतर प्रस्ताव केंद्राच्या ‘सॉल्ट पॅन विभागा’कडे पाठवला. केंद्राच्या मंजुरीनंतर उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली भाडे निर्धारण समिती गठित केली जाणार आहे.
advertisement
भाडे वाढीसाठीचं कारण काय?
एमएमआरडीएच्या अखत्यारितील महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) या संस्थेद्वारे ३५.१ किमी लांबीच्या या दोन मार्गिकांचे संचालन केले जाते. दररोज सध्या ३ लाखांहून अधिक प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. मात्र प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षात प्रवासीसंख्या किमान ९ लाख असणे अपेक्षित होते. अपेक्षित संख्येपेक्षा प्रवासी प्रवास न करत असल्याने उत्पन्न मर्यादित असून खर्च अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एमएमआरडीएला मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत आहे.
इतर मार्गांच्या तुलनेत कमी दराचा फटका...
मुंबईतील इतर मेट्रो मार्गिकांच्या तुलनेत या मार्गिकांचे भाडे तुलनेने कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. भुयारी मेट्रो-३ वर ८-१२ किमी प्रवासासाठी ४० रुपये तर मेट्रो-१ वर ८ ते ११.४ किमी साठी ४० रुपये आकारले जातात. परंतु मेट्रो २A आणि ७ वर ३-१२ किमी प्रवासासाठी फक्त २० रुपये भाडे आकारले जाते.
भाडेवाढीसंदर्भातील अंतिम प्रस्ताव समितीकडून राज्य सरकारला पाठवला जाईल. राज्याची मंजुरी मिळाल्यानंतरच भाडेवाढ लागू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
