मुंबई ही मराठी माणसाची राजधानी असून या शहराच्या कारभारात, प्रशासनात आणि नेतृत्वात मराठी अस्मितेला नेहमीच मध्यवर्ती स्थान राहिले आहे. मात्र उत्तर भारतीय महापौराच्या चर्चेने पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात भाषिक ओळखीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उत्तर भारतीय उमेदवाराला महापौर करण्याच्या चर्चेवरून सध्या राजकीय वातावरण तापले असले, तरी मुंबईच्या जनभावना स्पष्ट आहे की, मुंबईचा महापौर मराठीच असावा. हीच भूमिका शिवसेना, मनसे अनेक प्रादेशिक पक्षांनी ठामपणे मांडली आहे.
advertisement
मुंबईच्या इतिहासात दोन अमराठी महापौर
मात्र मुंबईच्या इतिहासात दोन अमराठी महापौर झाले आहे. काँग्रेसने हिंदी भाषिक आर.आर. सिंह आणि मुरली देवरा यांना महापौर केले होते. मात्र तो काळ वेगळा होता आणि सध्याची परिस्थिती वेगळी आहे. कारण जवळपास तीन दशकांपासून मुंबईच्या महापौरपदावर सातत्याने मराठी भाषिक प्रतिनिधी निवडून येत आहेत. आज मुंबईत विविध भाषिक समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असले, तरी मुंबईची ओळख मराठी भाषेने आणि संस्कृतीनेच घडलेली आहे, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे महापौरपदासारख्या सर्वोच्च स्थानावर मराठी नेतृत्व असावे, ही अपेक्षा स्वाभाविक मानली जाते.
मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने वाद चिघळला
दरम्यान, मीरा-भाईंदर येथे झालेल्या उत्तर भारतीय संमेलनात माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीय महापौराबाबत केलेल्या विधानामुळे वाद अधिकच चिघळला. या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेने तीव्र प्रतिक्रिया देत, मुंबईच्या राजकारणात परप्रांतीय वर्चस्व लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर भाजपाने स्पष्टीकरण देत, मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच असेल, अशी भूमिका जाहीर केली. शिंदे गटाच्या शिवसेनेनेही मराठी अस्मितेच्या बाजूने भूमिका घेतली.
आतापर्यंत लाभलेले दोन अमराठी महापौर कोण?
स्वातंत्र्यानंतर मुंबईने विविध भाषिक पार्श्वभूमीचे महापौर पाहिले असले, तरी गेल्या 30 वर्षांत मुंबईकरांनी सातत्याने मराठी नेतृत्वालाच संधी दिली आहे. माजी महापौर मुरली देवरा (1977-78) आणि आर.आर. सिंह (1993–94) हे हिंदी भाषिक असले, तरी ते काळ वेगळ्या राजकीय समीकरणांचा होता. आज मात्र मुंबईतील मराठी मतदार अधिक जागरूक असून, शहराच्या सर्वोच्च पदावर मराठी ओळखीचे नेतृत्वच हवे, अशी भावना प्रकर्षाने पुढे येत आहे.
मुंबईचा इतिहास बहुभाषिक असला, तरी मुंबईची आत्मा मराठी आहे. महापौरपदाबाबतची भूमिका ही केवळ राजकीय नसून, मराठी अस्मितेची अभिव्यक्ती असल्याचे मुंबईकरांचे मत आहे.
