लोकलमधील गर्दी ठरली घातक
मध्य रेल्वेवर दर रविवारी रुळ आणि सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द होतात किंवा उशिराने धावतात. त्यामुळे स्थानकांवर मोठी गर्दी होते. अनेक प्रवाशांना दरवाजात उभे राहून किंवा लटकत प्रवास करावा लागतो. मनीष यांचा मृत्यूही अशाच गर्दीमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नाहूर स्थानकाजवळ प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू
advertisement
मनीष लोखंडे माटुंगा येथील रेल्वे वर्कशॉपमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. रविवारी त्यांनी कुर्ला स्थानकावरून बदलापूरच्या दिशेने जाणारी लोकल पकडली होती. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्यांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागला.
दुपारी सुमारे 1.50 वाजण्याच्या सुमारास लोकल नाहूर स्थानक परिसरात पोहोचली असताना अचानक त्यांचा तोल गेला. त्यामुळे तो थेट रुळांवर पडला. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मनीष यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. रविवार मेगाब्लॉकमुळे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी प्रवाशांकडून पुन्हा एकदा होत आहे.
