मुंबईहून बाहेर जाण्यासाठी ट्रॅफिकमुक्त नवा मास्टर प्लान तयार
या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली असून पुढील सहा महिन्यांत सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकतो.
मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि दररोज वाढणारी वाहनाची संख्या लक्षात घेता प्रवास अधिक सोपा आणि जलद व्हावा यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहतूक व्यवस्थेनुसार शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सागरी किनारा मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्ग तसेच इतर महत्त्वाचे रस्ते भूमिगत बोगद्यांशी जोडले जाणार आहेत.
advertisement
या बोगद्यांमुळे वाहनचालक थेट आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचू शकतील. विशेष म्हणजे मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांना शहरातील मुख्य रस्त्यांवर येण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमी होऊन वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात घटेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महापालिकेच्या योजनेनुसार हे भूमिगत बोगदे पुढील 30 वर्षांची वाहतूक लक्षात घेऊन तयार केले जाणार आहेत. सल्लागाराकडून सविस्तर प्रकल्प अहवाल, व्यवहार्यता अभ्यास, नकाशे तयार करणे, निविदा प्रक्रिया आणि मंजूर प्रकल्पाचे व्यवस्थापन अशी सर्व कामे केली जाणार आहेत.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा कालावधी सुमारे साडेपाच वर्षांचा असेल. सल्लागाराचा अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर मुंबईत मल्टिमोडल बोगद्यांचा प्रकल्प नेमका कसा राबवला जाणार, याचे स्पष्ट चित्र समोर येईल.
