सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कुर्ला परिसरात तब्बल पाच फूट पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. पाण्याचा प्रवाह इतका वाढला आहे की एलबीएस रोडवरील अनेक दुकानांत पाणी शिरले आहे. काही कार अक्षरशः पाण्याखाली गेल्या आहेत, तर बेस्ट बसचा जवळपास अर्धा भाग पाण्यात बुडाल्याचे दृश्य समोर आले आहे. नागरिकांना कमरेपर्यंतच्या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.
advertisement
मिठी नदीच्या पातळीत वाढ, एनडीआरएफचे पथक तैनात...
दरम्यान, मिठी नदीची पाणीपातळी चिंताजनकरीत्या वाढली असून नदीने धोक्याच्या इ्शाऱ्याजवळील पातळी गाठली आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नये आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
350 नागरिकांचे स्थलांतर
मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.या नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या महानगरपालिकेच्या मगन नथुराम मनपा शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच आता समुद्राची भरती ओसरू लागल्यानंतर मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागली असून ही पातळी 3.9 मीटर वरून आता 3.6 मीटर इतकी झाली आहे.