पोलिसांनी स्वतःची ओळख करून देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संवादादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना उद्देशून, “पोरांनो, आत्ता प्रेम करू नका. सध्या शालेय जीवन आहे. पुढे कॉलेज आहे, आयुष्य मोठं आहे,” असे सांगितले. सध्याच्या काळात लहान वयातच भावनिक गुंतागुंत वाढत असल्याचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांनी आधी शिक्षण आणि भविष्य घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा संदेश त्यांनी दिला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना परमेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच आई-वडिलांप्रती प्रेम आणि आदर ठेवण्याचे महत्त्व सांगितले.
advertisement
आई-वडिलांनी मुलांसाठी घेतलेल्या कष्टांचा उल्लेख करत, “पहिलं करिअर, पहिलं भविष्य घडवा; आयुष्य सुंदर आहे,” असे त्यांनी संवादात नमूद केले. सदर पोलीस कर्मचारी सोशल मीडियावर विविध विषयांवर व्हिडिओ पोस्ट करत असतात. विद्यार्थ्यांशी झालेल्या या संवादाचाही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, तो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी पोलिसांनी दिलेल्या संदेशाचे कौतुक केले असून, विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य दिशा मिळाल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी ही मुले अजून कोवळ्या वयातील असून, अशा विषयांवर आधीच भाष्य करून त्यांना घाबरवू नये किंवा अनावश्यक दबाव देऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
