30 वर्षांच्या वकिलीचा प्रवास अचानक थांबला
मालती पवार (वय59 ) या ठाण्यातील माजिवडा भागातील रहिवासी होत्या आणि त्या गेल्या 30 वर्षांपासून वकिली करत होत्या. त्या फॅमिली कोर्ट, हायकोर्ट आणि इतर न्यायालयांमध्ये ज्येष्ठ वकील आणि मध्यस्थम्हणून काम करत होत्या. सहकाऱ्यांमध्ये त्या शांत, समजूतदार आणि अनुभवी वकील म्हणून ओळखल्या जात.
'त्या' दिवशी नेमके घडले काय?
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील या न्यायालयात त्या एका प्रकरणाची प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, म्हणून त्या बाररूममध्ये विश्रांतीसाठी गेल्या आणि आपल्या पतींना फोन करून सांगितले की, ''माझी तब्येत ठीक नाही, मी थोडा वेळ बसते.'' पण काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
रुग्णालय अगदी जवळ, पण मदतीचा हात वेळेवर पुढे आला नाही
झटका आल्यावर कोणीही तात्काळ वैद्यकीय मदत दिली नाही. मालती पवार यांच्या पती रमेश पवार यांनी आरोप केला की, कोणीही सीपीआर दिला नाही, काही जण तिचा व्हिडिओ काढत होते. उलट काहींनी तिला पाणी आणि चहा देण्याचा प्रयत्न केला. कोर्टाच्या शेजारी जीटी हॉस्पिटल असतानाही तिला लगेच नेले गेले नाही.
रुग्णालय अगदी जवळ असूनही वेळेत उपचार न मिळाल्याने परिस्थिती गंभीर झाली. नंतर आझाद मैदान पोलिसांनी त्यांना कामा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्या आधीच मृत झाल्याचे सांगितले. रमेश पवार यांनी सांगितले की, ''संध्याकाळी साडेसहा वाजता पोलिसांचा फोन आला की, माझी पत्नी रुग्णालयात आहे. पण जेव्हा मी पोहोचलो तेव्हा ती स्ट्रेचरवर पडली होती, कोणताही सहकारी जवळ नव्हता.
या घटनेनंतर त्यांनी न्यायालय व्यवस्थेकडे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोर्टात डॉक्टर, फर्स्ट एड किट, ऑक्सिजन सिलिंडर यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. तातडीने उपचार मिळाले असते तर माझ्या पत्नीचा जीव वाचू शकला असता. आता अशा प्रकारे दुसऱ्या वकिलाचा मृत्यू होऊ नये, हीच माझी अपेक्षा आहे असे रमेश पवार यांनी म्हटले. या घटनेमुळे न्यायालय परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, वकिलांमध्ये वैद्यकीय सुविधांच्या अभावाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
