नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई तिकीट दर वाढणार?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नव्याने उभारलेला ग्रीनफील्ड प्रकल्प असून त्यासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी नवी मुंबई विमानतळावर हवाई शुल्क अधिक ठेवण्यात आले आहे तर दुसरीकडे मुंबई विमानतळ जुना म्हणजेच ब्राउनफील्ड असल्याने तेथील शुल्क तुलनेने कमी आहे. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्या कमी शुल्क असलेल्या विमानतळाकडे वळण्याची शक्यता निर्माण होते.
advertisement
ही अडचण टाळण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही विमानतळांना एकत्रित ग्रुप ऑफ एअरपोर्ट्सचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडला. दोन्ही विमानतळ एकाच महानगर क्षेत्रात असल्याने हवाई शुल्क समान ठेवावे,असा या प्रस्तावाचा उद्देश आहे. या प्रस्तावाला सिडकोनेही मान्यता दिली असून तो आता राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
जर दोन्ही विमानतळांवर समान हवाई शुल्क आकारले गेले तर नवी मुंबईतील तिकीट दर कमी होतील. मात्र त्याच वेळी मुंबई विमानतळावरील विमान प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही विमानतळांवरील तिकीट दर जवळपास समान पातळीवर येतील असे सांगितले जात आहे.
