ठाणे-सीएसएमटी मार्गावर वेग वाढणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव उड्डाणपूल पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. सध्या येथे 2+1 अशी वाहन मार्गिका असून ठाणे आणि पूर्व उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन मार्ग आणि सीएसएमटीकडे जाण्यासाठी एकच मार्ग उपलब्ध आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे विशेषतहा गर्दीच्या वेळेत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
advertisement
ही समस्या कायमची सोडवण्यासाठी समांतर उड्डाणपुलाचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. नवीन पूल सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग मिळणार असून विद्यमान पुलावरील ताण कमी होईल. परिणामी ठाणे ते सीएसएमटी प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि इंधन बचतीचा ठरेल असा दावा महापालिकेने केला आहे. वाहतूक पोलिसांनीही या पुलाच्या गरजेबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
या प्रस्तावित उड्डाणपुलाचा अंदाजे खर्च सुमारे 155 कोटी 2 लाख 37 हजार रुपये इतका आहे. यापूर्वी महालक्ष्मी परिसरातील काही उड्डाणपुलांच्या कामांवरून निर्माण झालेला वाद लक्षात घेता संभाव्य कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी हे काम त्याच कंत्राटदाराला देण्याचा विचार महापालिका करत आहे.
या दरम्यानच शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम वेगात सुरू असून साधारण मे 2026 पर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या रेल्वे हद्दीतील कामे, गर्डर बसवणे, पोहोच मार्ग आणि पादचारी भुयारी मार्गांचे काम प्रगतीपथावर आहे.
