कोपरखैरणेकरांना मोठा दिलासा
कोपरखैरणे येथील डी-मार्ट चौक ते तीन टाकीपर्यंतच्या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणावर पादचाऱ्यांची ये-जा असते. रस्ता ओलांडण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. तब्बल अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या स्कायवॉकचा प्रस्ताव अखेर मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वाशी-कोपरखैरणे मार्गावरील कोपरखैरणे सेक्टर 15 परिसरात उभारण्यात येणाऱ्या या पादचारी पुलासाठी सुमारे 6 कोटी 59 लाख 3,192 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पुलावर सरकते जिने तसेच लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींनाही याचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून या पुलाची मागणी सातत्याने केली जात होती.
advertisement
वाशी-कोपरखैरणे हा मार्ग नवी मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा मानला जातो. वाशी सेक्टर 9, 10, 15 आणि 16, जुहूगाव, रा. फा. नाईक चौक तसेच कोपरखैरणे सेक्टर 15 नाका या भागात सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ठराविक वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होते.
सेक्टर 9 आणि 10 दरम्यान बाजारपेठेजवळ स्कायवॉक उभारल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असली, तरी सेक्टर 15 नाक्यावर कोंडीचे प्रमाण अधिक आहे. या भागात लोकवस्ती, शाळा, महाविद्यालये, बसथांबे आणि बाजारपेठ असल्याने कायमच मोठी वर्दळ असते. कोपरखैरणे स्थानकातून सेक्टर 15 ते 18 मध्ये जाणाऱ्या नागरिकांमुळे सायंकाळी रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या वाढते. नव्या स्कायवॉकमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
