घर मिळणार म्हणून पैसे भरले अन्…
वांद्रे येथे राहणारा 38 वर्षीय तक्रारदार ओला-उबेरमध्ये चालक म्हणून काम करतो. काही वर्षांपूर्वी त्याची ओळख नवीनसिंग मानसिंग गोरखा याच्याशी झाली. नवीनसिंग याने मालाड येथील कुरार व्हिलेज, अप्पापाडा परिसरात एमएमआरडीएचा फ्लॅट मिळवून देतो, असे सांगितले. या फ्लॅटची मूळ किंमत 18 लाख रुपये असून तो फक्त 14 लाख रुपयांत मिळेल असे त्याने तक्रारदाराला भुलवले.
advertisement
नवीनसिंग याने घराचा ताबा तीन ते चार महिन्यांत मिळेल असे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने एकूण 9 लाख रुपये दिले. या व्यवहारात रवी सरवदे आणि मोहसीन अख्तर हे दोघेही सहभागी असून ते नवीनसिंगला मदत करत असल्याचे तक्रारदाराला सांगण्यात आले होते.
मात्र ठरलेला कालावधी संपूनही तक्रारदाराला घराचा ताबा मिळाला नाही. याबाबत विचारणा केली असता आरोपी टाळाटाळ करू लागले. तब्बल सहा वर्षे उलटूनही ना फ्लॅट मिळाला ना पैसे परत करण्यात आले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
