नवी मुंबई : ऐरोली येथील रहिवासी असलेल्या आणि दहावीत शिकणाऱ्या अनुष्का शहाजी केवळे या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेने अपमान केल्याने अनुष्काने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
अनुष्का केवळे हिची परीक्षा सुरू असताना तिच्या बाकाखाली कॉपी सापडल्याचा आरोप शिक्षकांनी केल्यानंतर तिने घरी येऊन आपल्या खोलीमध्ये आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तसेच मुख्याध्यापिकेनी विद्यार्थिनीचा आपमानसपद अपमान केल्याने अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले असे वडिलांचे म्हणणे आहे.
advertisement
अपमान सहन न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
सुशिलाबाई देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख यांनी तिला वर्गातील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर अपशब्द वापरून अपमानित केले. भर वर्गात झालेला अपमान सहन न झाल्याने अनुष्काने मानसिक तणावातून आत्महत्या केली, असे पालकांचे म्हणणे आहे.
मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी
या घटनेनंतर, अनुष्का केवळेच्या पालकांनी मुख्याध्यापिका देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार, रबाळे पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शिक्षकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह
घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनंतर विद्यालयातील इतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण टाकणाऱ्या घटनांचा उलगडा होत असल्याने शिक्षकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.