महापालिका निवडणुकीत अर्ज फेटाळलेल्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधातील याचिका न्यायालयाने स्विकारली आहे. उद्या शुक्रवारी सुनावणी निश्चित केली आहे.
मुंबईतील वांद्रे पूर्व येथील मोझम अली मीर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहे. किरकोळ आणि तांत्रिक कारणांचा आधार घेऊन विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज मनमानीपणे फेटाळल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. अधिकाऱ्यांची ही कृती असंवैधानिक आणि अरेरावीची असून, यामुळे अनेक इच्छुकांना निवडणूक लढवण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागले आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
advertisement
तसंच, महापालिका प्रशासनाचा हा पवित्रा राज्य निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणणारा असल्याची याचिकेत टीका केली आहे. महापालिका प्रशासनाकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या 12 डिसेंबर 2025 च्या अधिसूचनेतील अटींमध्ये बदल करून महानगरपालिका प्रशासन आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे.
महापालिका ही केवळ अंमलबजावणी करणारी संस्था असतानाही तिने आयोगाचे विशेष अधिकार डावलून उमेदवारीसाठी स्वतःच्या अटी लादल्या. आयोगाने आधी जाहीर केलेल्या कागदपत्रांच्या यादीचे उल्लंघन केल्याचा याचिकेत दावा केला आहे.
अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना मिळणार दिलासा
आता पुढील आठवड्यात मुंबई महापालिका निवडणूक होत आहे. यामध्ये अर्ज फेटाळल्या गेलेल्या इच्छुक उमेदवारांना आता उच्च न्यायालयाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. विविध कारणांमुळे बाद ठरवण्यात आलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांबद्दल न्यायालय काय निर्णय देते, हे पाहण्याचं ठरणार आहे.
