2012 पासून अपघातांचा अभ्यास
चैतन्य पाटील यांनी 2012 पासून मुंबई–गोवा महामार्गावरील अपघातांचा डेटा संकलित करून त्याचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासानंतर त्यांनी 2025 मध्ये प्रत्यक्ष पायी चालत रस्त्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईपासून सुरू झालेल्या या मोहिमेत त्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुढे गोवा असा तब्बल 29 दिवसांचा प्रवास केला. या काळात त्यांनी रस्त्यांची स्थिती, खड्डे, ब्लॅक स्पॉट्स, दिशादर्शक फलकांचा अभाव, अनधिकृत होर्डिंग्स, तसेच वाहतूक सुरक्षेतील त्रुटी यांचा बारकाईने अभ्यास केला.
advertisement
GPS, फोटो आणि त्रुटी–उपायांसह अहवाल
या सत्याग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ तक्रार न करता GPS Latitude–Longitude च्या आधारे फोटो काढून प्रत्येक त्रुटीचे अचूक स्थान नोंदवण्यात आले. या अहवालामध्ये फक्त रस्त्यांमधील दोष दाखवलेले नाहीत, तर प्रत्येक समस्येवर नेमक्या आणि व्यवहार्य उपाययोजना देखील सुचवण्यात आल्या आहेत.
चैतन्य पाटील यांच्या मते, “आज अनेकदा एखाद्या खड्ड्याचा फोटो व्हायरल झाला की 24 ते 28 तासांत तात्पुरते काम केले जाते. मात्र, एकाच ठिकाणी खड्डा बुजवला जातो आणि पुढचे अनेक खचलेले भाग तसेच राहतात. त्यामुळे महागडे काम करूनही रस्ता पुन्हा धोकादायक बनतो.”
अपघात, मृत्यू आणि कोकणाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम
मुंबई–गोवा महामार्गावर दरवर्षी हजारो अपघात आणि शेकडो मृत्यू होत आहेत. या अपघातांचा फटका केवळ प्रवाशांनाच नाही, तर कोकणाच्या पर्यटन, शेती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात बसत आहे.
कोकणात अद्याप पुरेशा प्रमाणात स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स आणि तातडीच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने, अपघातानंतर अनेकांचे प्राण वाचवणे कठीण ठरत आहे. त्यामुळे सुरक्षित रस्ते हे केवळ सुविधा नव्हे, तर गरज असल्याचे चैतन्य पाटील यांनी ठामपणे मांडले.
फक्त अहवाल नव्हे, प्रत्यक्ष समाजसेवा
या 29 दिवसांच्या सत्याग्रहात चैतन्य पाटील यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर प्रत्यक्ष समाजसेवाही केली.
1) रस्त्यावर पडलेले लोखंडी खिळे, सळ्या, तारा, पत्रे उचलून बाजूला केली.
2) अपघातात मृत झालेल्या जनावरांची व कुत्र्यांची योग्य विल्हेवाट लावली.
3) वाहनचालकांना स्टँड नीट लावणे, हेल्मेट वापरणे अशा मूलभूत सूचना दिल्या.
4) अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्सबाबत नोंदी केल्या.
अपघातग्रस्त कुटुंबे आणि लोकप्रतिनिधींशी संवाद
या मोहिमेदरम्यान चैतन्य पाटील यांनी अपघातग्रस्त व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अपघात कसा झाला, रस्त्याची नेमकी कोणती चूक कारणीभूत ठरली, याची माहिती संकलित केली. तसेच, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या सूचना आणि अनुभवही या अहवालात समाविष्ट करण्यात आले आहेत.
नागरिक म्हणून जबाबदारीची जाणीव
“मी कोणताही राजकीय हेतू ठेवलेला नाही. नागरिक म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडतो आहे,” असे सांगत चैतन्य पाटील यांनी हा सत्याग्रह केवळ आंदोलन नसून रस्ता सुरक्षेसाठीची लोकचळवळ असल्याचे स्पष्ट केले. मुंबई–गोवा महामार्ग सुरक्षित होण्यासाठी शासनाने तात्पुरत्या डागडुजीऐवजी शाश्वत आणि गुणवत्तापूर्ण काम करावे, हीच या सत्याग्रहामागील मुख्य मागणी आहे.





