TRENDING:

Loksabha Election : संध्याकाळी मोदी 'भूतपूर्व', सामनाच्या अग्रलेखातून टीकेचे बाण

Last Updated:

ढोंग, फसवणुकीचा आज पराभव, गंगा शुद्ध होईल असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक निकालाआधी मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. थोड्याच वेळात निकालाचे कल हाती येतील. लोकसभेत एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला गेला आहे. दरम्यान, निकालावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना या मुखपत्रातून भाजप सरकारवर जोरदार टीकास्र सोडले आहे. ढोंग, फसवणुकीचा आज पराभव, गंगा शुद्ध होईल असं म्हणत मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. देशात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी, चीनची घुसखोरी या समस्या असताना पंतप्रधान 365 दिवस प्रचार, ढोंग, चिखलफेक यातच दंग राहते. ध्यानधारणेचे नाटक करते असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
News18
News18
advertisement

जनता हीच देशाची भाग्यविधाती आहे. देशात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी, चीनची घुसखोरी यांसारख्या समस्यांचा आगडोंब उसळलेला असताना पंतप्रधानपदावरील व्यक्ती 365 दिवस प्रचार, ढोंग, चिखलफेक यात दंग राहते. स्वतः मानव नसून देव आहोत असे जाहीर करून 25 कॅमेरे लावून ध्यानधारणेचे नाटक करते. आपण गंगापुत्र असल्याचा आव आणते, पण गंगेत कोरोना काळात प्रेते वाहून गेली तशी त्यांची सत्ता निर्जीव प्रेतांप्रमाणे गंगेत वाहून जाताना दिसेल. 4 जूनच्या निकालानंतर गंगामाई शुद्ध होईल, पवित्र होईल. दहा वर्षांचे पाप पोटात घेऊन प्रवाहित होईल. त्या प्रवाहातून जनमताचा खरा कौल उसळत बाहेर पडेल. ‘मोदी’ नावाचे ढोंग गंगेच्या तळाशी कायमचे जाईल, लोकशाहीच जिंकेल!

advertisement

लोकसभा निवडणुकांचे निकाल आज लागतील. आज संध्याकाळी मोदी हे ‘भूतपूर्व’ होतील, पण या भूतपूर्वांनी केंद्रात तिसऱ्यांदा बसण्याची तयारी सुरू केली आहे. आश्चर्य असे की, केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता आली तर पहिली शंभर कोणकोणती कामे करायची या मुद्द्यावर मोदी यांनी म्हणे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन खलबते केली. देशाच्या काही भागांत उष्णतेची लाट आली आहे. मान्सूनची तयारी, रेमल चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यात मदत पोहोचत आहे की नाही याबाबत मोदी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असल्याची छायाचित्रे आवर्जून प्रसिद्ध केली गेली आहेत. लोकसभेचे निकाल लागायचे आहेत व काल आलेल्या ‘एक्झिट पोल’च्या भरवशावर मोदी हे तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांत भाजपची घोडदौड दाखवताच सोमवारी गुजराती व्यापाऱ्यांचा शेअर बाजार उसळला व कोट्यवधी रुपयांचा फायदा एका विशिष्ट गटाने केला. एक्झिट पोलचे आकडे काहीही असले तरी प्रत्यक्षात 4 जून रोजी देशात हुकूमशाहीचा पराभव होत आहे. बनावट एक्झिट पोल हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आज या घोटाळेबाज लोकांचा पराभव होईल व भारतमाता लोकशाहीच्या सुवर्णरथात विराजमान होऊन दिल्लीच्या दिशेने निघेल.

advertisement

भारताची मान शरमेने खाली झुकली

मागच्या दहा वर्षांत भारतात लोकशाहीचे एवढे पतन झाले की, भारतमातेची मान शरमेने खाली झुकली आहे. पुन्हा आज हुकूमशाहीचा पराभव झाला तरी मोदी-शहांचे रझाकारी संघटन सरळ मार्गाने सत्ता सोडील काय? लोकशाहीचा मान राखून परिवर्तन घडू देतील काय? की पराभव होताच संसदेचे दरवाजे आतून बंद करून स्वतःला कोंडून घेतील? असे प्रश्नदेखील आहेतच. हे लोक पराभूत झाले तरी सत्ता न सोडण्याचे हरएक प्रयत्न करतील. त्यामुळे मतमोजणीच्या केंद्रांवर आणि बाहेर सगळ्यांनी जागरूक राहायलाच हवे. निवडणूक आयोग, प्रशासन, पोलीस यंत्रणा, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन निर्णयात फेरफार करण्याचे कारस्थान किमान दोनशे मतदारसंघांत रचण्यात आले असून अमित शहा हे या कटाचे सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. 4 जूननंतर शहा-मोदींवर सत्तेचा दुरुपयोग केल्याबद्दल खटले भरले जाऊ शकतात. लोकशाहीचे मारेकरी 4 जूननंतर देशात उजळ माथ्याने फिरू शकणार नाहीत. लोकशाहीत जनमताचा कौल मान्य करावा लागतो, पण ‘जनमताचा कौल’ या सबबीखाली निकालांची खरेदी-विक्री आजचे सत्ताधारी करीत आहेत. जनमताचा कौल मान्य करायचे म्हणजे मोदी-शहांची एकतर्फी हुकूमशाही, दादागिरी, पक्षपह्डी मान्य करायची काय? जनमताचा कौल हा स्पष्टपणे मोदी सरकारविरोधात दिसत आहे. ज्याला तुम्ही राजकीय भाषेत ‘अंडरकरंट’ म्हणता. हा करंट भाजपविरुद्ध खदखदत आहे. हे चित्र देशभरात असताना मोदी हे 400 जागा जिंकणार असे कौल दाखवणे ही जनतेची फसवणूक व लोकशाहीशी बेइमानी आहे.

advertisement

पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार वाटते ते भांगेच्या नशेत

मोदी यांनी जनतेची व देशाची फसवणूकच केली. त्या फसवणुकीचे ‘ऑडिट’ करण्याची ही वेळ व जागा नाही. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकांनी मतदान केले असे ज्यांना वाटते ते भांगेच्या नशेत असावेत. मोदींचा फसवणुकीचा धंदा कायमचा बंद करण्यासाठी लोकांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या व त्याचाच निकाल आज लागेल. भारताचे भाग्यविधाते फक्त आपणच आहोत असा तोरा मोदींनी मिरवला. ते झूठ ठरले. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे व ते भवितव्य 140 कोटी जनतेच्या हाती सुरक्षित आहे. 2024 ची निवडणूक हे महाभारतच आहे. महाभारतात आपण काय पाहतो? भर दरबारात द्रौपदीची विटंबना चालली होती. सगळे दरबारी आणि भीष्म, द्रोणांसारखे सज्जन ते दृश्य सहन करीत होते. महाभारताच्या भाग्यविधात्याने द्रौपदीला वस्त्र पुरवली. म्हणून आम्ही म्हणतोय, जनता हीच देशाची भाग्यविधाती आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Loksabha Election : संध्याकाळी मोदी 'भूतपूर्व', सामनाच्या अग्रलेखातून टीकेचे बाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल