काय आहे प्रकरण?
धारावीच्या राजीव नगर भागात रविवारी रात्री अरविंद वैश्यची हत्या करण्यात आली. दोन गटांमध्ये सुरू असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या अरविंद वैश्य याची हत्या केली गेली. अरविंद वैश्यचा भाऊ शैलेंद्र वैश्यच्या तक्रारीनुसार रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अल्लू, आरिफ, शुभम आणि शेर अली यांचं सिद्धेशसोबत भांडण सुरू होतं. हे भांडण सुरू असताना अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सिद्धेश आणि त्याच्या वडिलांना मारायला सुरूवात केली. हे भांडण सोडवायला अरविंद तिकडे गेला, तेव्हा अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अरविंदला मारहाण केली.
advertisement
या मारहाणीची तक्रार द्यायला अरविंद एका मित्राच्या बाईकवर धारावी पोलीस स्टेशनमध्ये गेला. यावेळी मागून सद्दाम आणि जुम्मनही गेले, ज्यांनी अरविंदला पोलिसांसमोरच केस मागे घ्यायची धमकी दिली. केस मागे घेतली नाही तर परिणाम भोगायला तयार राहा, अशी धमकी अरविंदला दिली गेल्याचं त्याच्या भावाने सांगितलं आहे.
सद्दाम आणि जुम्मन यांनी पोलीस स्टेशनमध्येच अरविंदला धमकी दिली, पण तरीही पोलिसांनी या धमकीकडे लक्ष न देता दोन शिपायांसोबत अरविंदला घटनास्थळी पाठवलं, असा आरोप करण्यात येत आहे. अरविंद आणि त्याचा मित्र राजीव नगरमधल्या वसीम गॅरेजच्या पुढे गेले तेव्हा अल्लू, आरिफ, सद्दाम, जुम्मन, शेर अली आणि शुभम यांनी दोघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यानंतर पोलीस शिपायांनी अल्लूला पकडलं, पण इतर आरोपी तिकडून पळून गेले. यानंतर आरिफलाही पकडण्यात आलं. अरविंद वैश्यला गंभीर जखमी अवस्थेत सायनच्या रुग्णालयात नेण्यात आलं, जिकडे त्याचा मृत्यू झाला.
आरएसएसचा कार्यकर्ता असलेल्या अरविंद वैश्यच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांच्या समोर अशी निघृणपणे हत्या होत आहे, पोलीस स्टेशनमध्ये येऊन अरविंदने मदत मागितली ही त्याची चूक आहे. सरकारने हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित कारवी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. तसंच अरविंद वैश्यच्या कुटुंबाला मदत मिळावी आणि फरार आरोपींना अटक करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे.
अरविंद वैश्यवर 7 जणांनी हल्ला केला, पण पोलिसांनी फक्त 2 आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामुळे नाराज झालेल्या बजरंग दलासह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केलं. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच धारावीमध्ये सुरू असलेल्या लॅण्ड माफिया, ड्रग्ज तस्कर आणि असामाजिक तत्वांवर कारवाईची मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे.