राज्यात पुढील काहीच दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याअगोदर विविध राजकीय पक्षांच्या जागा वाटपासाठी जोरबैठका सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत 'ज्याचा आमदार त्याची जागा' असे सर्वसाधारण सूत्र ठरलेले आहे. मुंबईमध्ये तर मविआ आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून तीव्र स्पर्धा आहे. ज्या ठिकाणाहून फहद अहमद यांना विधानसभा लढायची आहे, तिथे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक आहे.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फहद अहमद यांना अणुशक्तीनगरमधून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाकडे फहद यांनी उमेदवारी मागितली असल्याची माहिती कळते आहे. जर समाजवादी पक्षाने तिकीट दिले तर नक्कीच विधानसभेला सामोरे जाणार असल्याचे फहद अहमद यांनी सूत्रांना सांगितले. सध्या अणुशक्तीनगरचे प्रतिनिधित्व नवाब मलिक करत आहेत. मात्र यंदाच्या वर्षी त्यांची लेक सना मलिक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अणुशक्तीनगरमधून चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फहद अहमद यांच्यासाठी समाजवादी पक्षाची फिल्डिंग
फहद अहमद यांच्यावर समाजवादी पक्षाच्या युवक संघटनेची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी गेली अनेक महिने ते काम करत आहेत. याकामी त्यांना मुंबईतरी काही अंशी यश आले आहे.
फहद अहमद यांच्यासाठी समाजवादी पक्षाने देखील फिल्डिंग लावली आहे. महाविकास आघाडीत अणुशक्तीनगरची जागा समाजवादी पक्षाला मिळावी, यादृष्टीने पक्षातील शीर्षस्थ नेत्यांनी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने महाविकास आघाडीकडे अणुशक्तीनगरची जागा मागितली असल्याची देखील माहिती कळतीये.
फहद अहमद यांनी गेल्यावर्षी स्वरा भास्करशी बांधली लग्नगाठ, लग्नाची देशात चर्चा
बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने राजकीय नेता तसेच सामाजिक कार्यकर्ता फहाद अहमदशी गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली. ६ जानेवारी २०२३ ला स्वरा आणि फहादने कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाची संपूर्ण देशभरात चर्चा झाली.
