वातावरणात गारवा असताना थंडी दूर करण्यासाठी जर तुमचा शेकोटी पेटवण्याचा प्लॅन असेल तर आत्ताच सावधान. ठाणे पालिकेच्या प्रदूषण विभागाने यासाठी पावले उचलली आहेत. गुरूवारी पहाटे ठाणे शहरातील तापमानाचा पारा पहिल्यांदाच या हंगामात 20 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. कालपासून ठाण्यासह जिल्ह्यातही कमी तापमानाची नोंद झालेली आहे. 19.9 सेल्सिअस तापमान हे यंदाच्या थंड हंगामातील सर्वांत कमी तापमान ठरले आहे. जर तुम्ही ठाण्यातील रहिवासी असाल तर थंडीची हुडहुडी कमी जाणवण्यासाठी तुम्ही शेकोटी पेटवणार असाल तर हजारो रूपयांचा दंड भरण्यास तयार राहा.
advertisement
शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शेकोटी पेटविल्यास 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. प्रदूषण विभागाच्या प्रमुख मनिषा प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, उघड्यावर कचरा जाळून शेकोट्या पेटवल्यास हवा दूषित होते. पालिका अशा प्रत्येक प्रकरणात 5 हजार दंड आकारणार आहे. आवश्यक कायदेशीर कारवाईही केली जाईल. थंडी वाढत असताना ऊब मिळवण्यासाठी शेकोटी पेटवणे अनेकांसाठी गरजेचे असते. कचरा जाळून प्रदूषण केल्यास पालिकेची कठोर कारवाई टाळता येणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. आता ठाणे महानगर पालिका ॲक्शन मोडवर आली आहे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा किंवा फुफ्फुसाचे विकार असलेल्या रुग्णांवर या धुराचा मोठा परिणाम होतो. खोकला, दम लागणे, छातीत संसर्ग, घसा दुखणे आणि ऑक्सिजनची पातळी घटणे यांसारखे त्रास वाढू शकण्याची शक्यता आहे. हवेतील प्रदूषण वाढू नये आणि आरोग्याचे संरक्षण व्हावे, यासाठी पालिकेच्या प्रदूषण विभागाने कडक भूमिका घेतली आहे. उघड्यावर शेकोटी म्हणून कचरा जाळणाऱ्यांवर थेट 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. यासाठी चार विशेष पथके तयार केली असून वेगवेगळ्या प्रभागांत गस्त घालून कचरा जाळणाऱ्यांना रोखणार आहेत.
