मुंबई : मुंबईच्या पवई भागातील एका स्टुडिओमध्ये 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेत या मुलांची सुटका केली आहे. पोलिसांनी बाथरूममधून मुलांना ओलिस ठेवलेल्या ठिकाणी प्रवेश केला. मुलांची सुटका करत असताना पोलिसांना गोळीबारही करावा लागल्याची माहिती मिळत आहे, या गोळीबारामध्ये आरोपी जखमी झाल्याची माहिती स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे. जखमी अवस्थेमध्येच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
advertisement
मुलांना ओलीस ठेवल्यानंतर काही वेळातच पोलिसांना सर्व मुलांना सोडवण्यात यश आलं आहे. हा आरोपी मनोरुग्ण असून त्याने पवई भागातल्या एका स्टुडिओमध्ये मुलांना डांबून ठेवलं होतं. मुलं स्टुडिओच्या काचेच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना प्रत्यक्षदर्शींना दिसली.
ही घटना पवईमधल्या आरए स्टुडिओमध्ये घडली, जिथे अभिनयाचे वर्ग नियमितपणे घेतले जातात. मुलांना ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव रोहित आर्य असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित आर्य हा स्टुडिओमधलाच कर्मचारी आहे आणि तो एक युट्युब चॅनलही चालवतो. मागच्या चार ते पाच दिवसांपासून रोहित परिसरात ऑडिशन्स घेत होता. गुरूवारी सकाळी 100 मुले ऑडिशन्ससाठी आली तेव्हा त्याने 80 मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिली. पण 15 ते 20 मुलांना आतच कोंडून ठेवले.
मुलांना कोंडून ठेवल्यानंतर रोहित आर्यने एक व्हिडिओ शेअर केला. 'मी एक योजना आखली, मला काही लोकांसोबत बोलायचं आहे. माझ्या मागण्या मोठ्या आर्थिक नाहीयेत, तर नैतिक आहेत. मला प्रश्न विचारायचे आहेत आणि उत्तरे मिळवायची आहेत. मी दहशतवादी नाही. मी आक्रमक हालचाली करून चिथावणी देऊ शकतो. मला उत्तेजित करू नका', असं रोहित आर्य त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.
