बंदी कोणत्या वेळेत असेल?
कल्याण वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून दररोज संध्याकाळी 4 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत जड आणि अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. या वेळेत फक्त हलक्या वाहनांची आणि सार्वजनिक वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील. ट्रक, ट्रेलर, कंटेनर, डंपर आदी वाहनांना दुर्गाडी किल्ला परिसर तसेच शहराच्या मुख्य मार्गांवर प्रवेश दिला जाणार नाही.
advertisement
वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी या निर्णयाची अधिसूचना काढून माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, नवरात्रोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी अपेक्षित आहे. दुर्गाडी किल्ला परिसर हा शहरातील मुख्य चौकाजवळ असल्याने येथे वाहतुकीचा मोठा दबाव येतो. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना प्रवेशबंदी हा पर्याय अवलंबण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
यावेळी जड वाहन चालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. महामार्ग आणि बायपास मार्गांचा वापर करून वाहनधारकांनी आपल्या जागी पोहोचावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.
कल्याण शहरात दुर्गाडी नवरात्रोत्सव हे एक मोठे आकर्षण मानले जाते. राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येथे येतात. किल्ल्याच्या परिसरात धार्मिक कार्यक्रम, देवीची आरती, महाप्रसाद तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे रात्रभर भक्तांचा ओघ सुरू राहतो. या उत्सवाचे सुरळीत आयोजन आणि नागरिकांना वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना आखल्या गेल्या आहेत.