प्रवासाचा वेळ आणि ताण दोन्ही कमी होणार
सध्या मेट्रो 1 वर एकूण 16 गाड्या चालतात आणि त्या चार डब्यांच्या आहेत. या गाड्या सहा डब्यांच्या करण्यासाठी 32 अतिरिक्त डबे आवश्यक आहेत. एमएमओपीएलने या डब्यांच्या खरेदीसाठी इंडिया डेब्ट रिझोल्यूशन कंपनीमार्फत नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर लगेच डबे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याचवेळी, परवानगी मिळण्याची वाट पाहत असतानाच कंपनीने निविदा मागविण्याची तयारी केली आहे.
advertisement
सध्या या मार्गावर दररोज साडेपाच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात, तर महिन्याला सुमारे 1.3 कोटी प्रवासी या मेट्रोचा वापर करतात. ऑफिसच्या वेळेत गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सहा डब्यांच्या गाड्या सुरू झाल्यावर प्रवाशांची सोय होणार आहे.
मेट्रो 1 प्रकल्पावर सुमारे 1,711 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज सहा बँकांनी दिले होते. पण एमएमओपीएलला हे कर्ज फेडणे शक्य झाले नाही. त्यामुळे हे कर्ज सरकारी नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे विकले गेले आहे. त्यामुळे आता नवीन डबे खरेदी करण्यासाठी त्या कंपनीची परवानगी आवश्यक आहे. एमएमओपीएलने त्यासाठी अर्ज सादर केला असून परवानगी मिळेपर्यंत निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सहा डब्यांच्या मेट्रो गाड्या धावू लागल्यावर एकावेळी 2,250 प्रवाशांची वाहतूक शक्य होईल. सध्या चार डब्यांच्या गाड्या 1,750 प्रवासी जाऊ शकतात. त्यामुळे प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होईल. एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे दररोज 10 लाखांहून अधिक प्रवासी मेट्रो 1 ने प्रवास करू शकतील. गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होईल.
हा बदल मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. सहा डब्यांच्या गाड्या सुरू झाल्यावर कार्यालयीन वेळेतील प्रचंड गर्दीतून सुटका होईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि मेट्रोचा अनुभव आणखी सुखदायी बनेल.
