महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत 17.7 किलोमीटर लांबीचा हा सी लिंक उभारला जात आहे. या मार्गावर एकूण 8 मार्गिका असतील. त्यातील मुख्य सागरी सेतू 9.60 किलोमीटर लांबीचा असून तो समुद्रात सुमारे 900 मीटर आत उभारला जाणार आहे. सध्या समुद्रातील पुलाच्या कामाला वेग देण्यात आला असून एकूण प्रगती 30 टक्क्यांवर पोहोचली आहे.
advertisement
प्रकल्पाचे काम 2019 मध्ये सुरू झाले होते आणि ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र कोरोना टाळेबंदीमुळे काम काही काळ पूर्णपणे ठप्प झाले. त्याचदरम्यान कंत्राटदार रिलायन्स इन्फ्रा आर्थिक अडचणीत सापडल्याने प्रकल्पावर परिणाम झाला. त्यानंतर 2022 मध्ये अपको इन्फ्राटेक आणि वी बिल्ट यांनी काम हाती घेतले. तरीही गेल्या 4 वर्षांत प्रगती मर्यादित राहिली.
आता कामातील प्रमुख अडथळे दूर झाले असून प्रशासनाने कामाचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. मागील वर्षी प्रकल्पासाठी 16 बार्जेस कार्यरत होत्या तर यंदा ही संख्या दुप्पट करून 32 करण्यात आली आहे. समुद्रातील कामे मे महिन्याच्या मध्यापर्यंतच शक्य असल्याने त्याआधी जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पावसाळ्यानंतर बार्जेसची संख्या आणखी वाढवून काम जलदगतीने पूर्ण करण्याचा मानस आहे.
या प्रकल्पाचा एकूण खर्च 18,120 कोटी रुपये असून सुधारित मुदत मे 2028 अशी निश्चित करण्यात आली आहे. हा सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.






