मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जोगेश्वरी पूर्व भागातील पश्चिम दृतगती मार्गावर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या भूतबंगला परिसरात राहणारा एक तरुण रात्री बाहेर फिरण्यासाठी आला होता. जयकोच इथं पोहोचला असता अचानक एका ड्रेनेजच्या झाकणामध्ये या तरुणाचा पाय अडकला. या तरुणाचा एक पाय हा अर्धात ड्रेनेजच्या झाकणाच्या होलमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याला आपला पाय बाहेर काढता येत नव्हता.
advertisement
या तरुणाचा गुडघ्यापर्यंतचा पाय हा ड्रेनेजच्या गोलाकार होलमध्ये फसला होता. या तरुणाने याची माहिती कुटुंबीय आणि मित्रांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणाची अवस्था पाहून सगळ्यांना धक्का बसला. त्यांनी बराच प्रयत्न केला. पण ड्रेनेजच्या गोलाकार होलमधून या तरुणाचा पाय काही बाहेर काढता येईना. उलट वेदना जास्त होत असल्यामुळे या तरुणाची बेशुद्ध अवस्था झाली.
अग्निशमन दलाने ४ तासांच्या प्रयत्नानंतर केली सुटका
अखेरीस याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान , पोलीस आणि महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या तरुणाचा पाय बाहेर काढण्याचं मोठं आव्हान जवानांसमोर होतं. जवानांनी ड्रेनेजच्या बाजूला तोडकाम सुरू केलं. यावेळी या तरुणाला इजा होऊ नये म्हणून खबरदारीही घेतली. त्यामुळे पायाच्या बाजूला ड्रेनेजचं झाकण तोडण्यात आलं. अखेरीस ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाचा पाय बाहेर काढता आला. तोपर्यंत पहाटेचे ४:३० वाजले होते. त्यानंतर या तरुणालाा तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. या तरुणाची सुखरूप सुटका केल्याबद्दल स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचं कौतुक केलं.