इंदूरमधील पंढरीनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नंदलालपुरा भागात 25 तृतियपंथीयांनी एका खोलीमध्ये एकत्र फिनाईल घेतलं, यानंतर त्यांना महाराजा यशवंतराव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने फिनाईल घेतलेल्या सगळ्या तृतियपंथीयांना जीव वाचला आहे.
तृतियपंथीयांच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भागामध्ये सपना गुरूचा एक गट आहे, तर दुसरा गट सीमा आणि पायल यांचा आहे. सपना गुरू आणि तिच्या तीन सहकाऱ्यांनी सामुदायिक परिषदेसाठी जमा केलेली सुरक्षा ठेव परत द्यायला नकार दिला, तसंच त्यांनी तृतियपंथीयांच्या दुसऱ्या गटावर हल्ला केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला आहे. सपना गुरू आणि तिच्या सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून फिनाईल पित असल्याचं या तृतियपंथीयांनी सांगितलं.
advertisement
150 कोटींचा वाद, धर्मांतराचा दबाव?
'मुस्लिम तृतियपंथी हिंदू तृतियपंथीयांवर धर्मांतरासाठी दबाव टाकत आहेत, तसंच धर्मांतर केलं नाही, तर एचआयव्हीचं इंजेक्शन देण्याचा दबाव टाकत आहेत. 150 कोटी रुपयांची संपत्ती या वादाचं कारण आहे. या भागातल्या तृतियपंथीयांकडे लक्झरी कार, आलिशान घरं, महागडे दागिने आहेत', असा आरोप वकील सचिन सोनकर यांनी केला आहे.
बुधवारी रात्री या 25 तृतियपंथीयांनी फिनाईल प्राशन केलं होतं, पण त्याआधी मंगळवारी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी इंदूरमध्ये आल्या होत्या. दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी लक्ष्मी त्रिपाठी पोलिसांनाही भेटल्या होत्या. तृतियपंथीयांच्या वादाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, पण या समितीचा तपास अजून पूर्ण झालेला नाही.
भाजप नेते पोलिसांच्या भेटीला
दरम्यान तृतियपंथीयांनी फिनाईल प्राशन केल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली आहे. या शिष्टमंडळामध्ये भाजपचे आमदार, खासदार आणि इतर नेत्यांचाही समावेश होता.