ज्योती मल्होत्रानंतर आता पाकिस्तानी गुप्तहेर प्रकरणाची लिंक ओडिसापर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणी गुप्तचर यंत्रणा आयबीने ओडिशातील प्रियांका सेनापतीला ताब्यात घेतलं आहे. कालपासून तिची अज्ञात स्थळी कसून चौकशी केली जात आहे. हेरगिरी प्रकरणात अटक केलेल्या ज्योती मल्होत्रासोबत तिचे कनेक्शन्स असल्याची माहिती पुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
सध्या वरिष्ठ तपास अधिकारी अज्ञात ठिकाणी प्रियांका सेनापतीची चौकशी करत आहेत. तिचं हेरगिरी करण्यात हात आहे का? तसेच तिचे ज्योती मल्होत्रासोबत कसे संबंध होते, याची पडताळणी केली जात आहे. राज्य आणि केंद्रीय गुप्तचर अधिकारी संयुक्तपणे चौकशी करत आहेत.
advertisement
ज्योती मल्होत्रा पुरीमध्ये किती काळ राहिली? ती कोणत्या ठिकाणी गेली? प्रियांकाचे तिच्याशी किती काळ संबंध होते? तिने कोणते फोटो काढले आणि मंदिराबद्दल तिने काय चर्चा केली? पुरीनंतर ज्योती ओडिशातील इतर कोणत्या ठिकाणी गेली, याबद्दल प्रियांकाकडे चौकशी केली जात आहे. प्रियांका सेनापती देखील एक यूट्यूबर असून तीदेखील सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. ज्योती मल्होत्रानंतर हेरगिरी प्रकरणात तिचंही नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता यात आणखी कुणाचा कनेक्शन समोर येऊ शकतं, याचा तपास पोलीस करत आहेत.