नवी दिल्ली: मोबाईल नेटवर्क नीट मिळावे यासाठी अनेकजण घरात, बाल्कनीत किंवा इमारतीच्या कडेला जाऊन फोन वापरण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी जीवावर बेतू शकतात, याचा धक्कादायक प्रत्यय नोएडामध्ये आला. सेक्टर 104 येथील एका उच्चभ्रू निवासी इमारतीत शनिवारी सकाळी नेटवर्क मिळवण्याच्या प्रयत्नात 17व्या मजल्यावरून खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
advertisement
नोएडामधील सेक्टर 104 येथील एका उच्चभ्रू निवासी इमारतीत शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मोबाईल नेटवर्क नीट मिळावे म्हणून फ्लॅटच्या बाल्कनीत गेले असताना ते 17व्या मजल्यावरून खाली पडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत व्यक्तीचे नाव अजय गर्ग असे असून ते दिल्लीतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. ते पत्नीसमवेत एटीएस वन हॅम्लेट या गृहनिर्माण संकुलात राहत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे 10.20 वाजण्याच्या सुमारास घडली. अजय गर्ग यांनी काही वेळापूर्वी पत्नीशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा एक कॉल आला. फ्लॅटमध्ये मोबाईल नेटवर्क नीट लागत नसल्यामुळे कॉल घेण्यासाठी ते बाल्कनीत गेले. काही क्षणांतच ते थेट 17व्या मजल्यावरून खाली कोसळले.
संकुलातील रहिवाशांच्या लक्षात येताच, गर्ग यांना तातडीने सेक्टर 110 येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्राथमिक तपासात उंचावरून पडल्यामुळेच मृत्यू झाल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्यासाठी तपास सुरू आहे. सर्व शक्यता तपासल्या जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात सोसायटी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून कुटुंबीयांचेही जबाब नोंदवले जात आहेत. अजय गर्ग आणि त्यांची पत्नी मूळचे कानपूरचे रहिवासी असून त्यांचा मुलगा सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.
