बिहारमध्ये सर्वाधिक जागा असूनही भाजपला उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. तर, दुसरीकडे कमी आमदार असूनही नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कायम राहिले. आता भाजपकडून बिहारमध्ये आपला पहिला मुख्यमंत्री बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे.
अमित शाहांनी काय म्हटले होते?
advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, नोव्हेंबरच्या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएच्या प्रचाराचे नेतृत्व मुख्यमंत्री नितीशकुमार करतील. पक्षाचे संसदीय मंडळ निवडणुकीनंतर यावर निर्णय घेईल. निवडणुकीनंतर पक्षाने स्वतःचा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली आहे, असे पक्षातील काही नेत्यांना वाटत असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. भाजप आता स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करण्यास सक्षम आहे. तसेच 2025 मध्ये त्यांना अधिक जागा लढवायच्या आहेत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी बिहारच्या आगामी निवडणुकीबाबत दोन दिवसांपूर्वी सूचक वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री पक्षाचा असावा असे भाजपला वाटते यात काहीही चूक नाही. परंतु निवडणुका नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चिराग पासवान यांनी काय म्हटले?
केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे व्हिजन असणारा व्यक्ती बिहारचा पुढील मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य केले. त्यामुळे आता बिहारच्या राजकारणातील चित्र अधिकच अनिश्चित झाले आहे.
नितीश कुमारांच्या नाराजीचे काय?
केंद्रातील भाजप सरकार हे सध्या जेडीयू आणि तेलगू देसम यांच्या टेकूवर आहे. तेलगू देसमकडे 16 आणि जेडीयूकडे 12 खासदार आहेत. या दोन्ही पक्षांनी पाठिंबा काढल्यास केंद्रातील सरकार अल्पमतात येऊ शकते. भाजपला अपक्ष आणि लहान घटक पक्षांची मनधरणी करावी लागेल. त्यामुळे नितीश कुमारांची नाराजी भाजपला महागात पडू शकते.
2020 च्या विधानसभेची आकडेवारी काय?
2020 च्या विधानसभा निवडणुकीत 243 जागांपैकी भाजपने 110 जागांवर उमेदवार लढवले. त्यापैकी 74 जागा जिंकल्या. तर नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडने 115 जागा लढवून 43 जागांवर विजय मिळवला. सध्या एनडीए असलेल्या चिराग पासवान यांच्या नेतृत्त्वातील लोकजनशक्ती पक्षाने 110 जागा लढवल्या. अनेक ठिकाणी चिराग पासवान यांच्या उमेदवारांचा फटका नितीश कुमारांच्या उमेदवारांना बसला होता. पासवानांमुळे नितीश कुमारांच्या जागा पडल्या.