हरियाणातील हिसार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ब्रिजेंद्र सिंह हे वडिलांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ब्रिजेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, राजकीय कारणास्तव भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान मोदी, अमित शहा यांनी मला हिसारच्या लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो.
advertisement
ब्रिजेंद्र सिंह हे माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील बिरेंद्र सिंह हे २०२२ पर्यंत राज्यसभा खासदार होते. तर पाच वेळा आमदार आणि तीन वेळा राज्यात मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. १९८४ मध्ये ओमप्रकाश चौटाला यांचा त्यांनी पराभव केला होता. २०१९ मध्ये बिरेंद्र सिंह यांनी मुलगा ब्रिजेंद्र याला तिकिट मिळवून दिलं होतं. यावेळी तिकिट मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
रविवारी सायंकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये ब्रिजेंद्र सिंह यांच्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे हिसारमध्ये उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू आहेत.