दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या मालिकेसाठी नुकतीच भारत अ संघाची निवड करण्यात आली. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघात सरफराजची निवड न झाल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी सरफराजची निवड न होण्यावर गौतम गंभीरला लक्ष्य करीत त्याचे आडनाव खान आहे, एवढ्यासाठीच त्याला संघाबाहेर ठेवले जात आहे असे म्हणत गौतम गंभीर संघनिवड करताना राजकारण करीत असल्याचे म्हटले आहे.
advertisement
काँग्रेसचा गौतम गंभीरवर सनसनाटी आरोप
सरफराज शेवटचा न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत भारताकडून खेळला होता आणि त्याला ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती. इंग्लंड दौऱ्यासाठीही त्याची निवड करण्यात आली नव्हती. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठीही त्याचा विचार करण्यात आला नाही. जवळपास सलग चार मालिकांतून त्याला वगळण्यात आल्याने सरफराजचे काय चुकतेय? त्याला अजून किती मेहनतीची गरज आहे? असे संतप्त सवाल विचारले जात आहेत.
शमा मोहम्मद यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करून सरफराजची निवड त्याच्या आडनावामुळे झाली नाही का? असा सवाल केला. या मुद्द्यावर गौतम गंभीर काय विचार करतो, हे आम्हाला ज्ञात आहे, असा टोलाही शमा मोहम्मद यांनी विचारला आहे.
सरफराजने अजिंक्य रहाणेला बोलले पाहिजे
सरफराज सध्या सहाव्या क्रमांकावर खेळतो. खरे तर त्याने ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि मुंबईचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेशी बोलायला हवे. सरफराजने शक्य तितक्या वरच्या क्रमांकावर खेळायला हवे. तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार, याची भारतीय संघात चर्चा सुरू आहे. सरफराजने नव्या चेंडूवर खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा. कारण सहाव्या क्रमाकांवर खेळण्यासाठी भारतीय संघात अनेक अष्टपैलू खेळाडू दावेदार आहेत, असे एका माजी निवडकर्त्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
रविंद्र जाडेजा, रिषभ पंत, वॉश्टिंगटन सुंदर, नितीन रेड्डी हे खेळाडू पाचव्या, सहाव्या क्रमाकांवर खेळतात. अष्टपैलू खेळाडू म्हणून अनेकांनी दावेदारी सिद्ध केलेली आहे, ध्रुव जुरेलने देखील नुकतेच शतक केले आहे. अशावेळी सरफराजने वरच्या क्रमाकांवर आपली दावेदारी सिद्ध करायला हवी, असेही माजी निवडकर्ते म्हणाले.